Join us

जनावरांना ऊस वाढे खायला देणं कितपत योग्य; त्याचे परिणाम काय? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 13:10 IST

सध्या साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. सगळीकडे ऊस तोड सुरू आहे. अनेक ठिकाणी पशुपालक उसाचे वाढे आपल्या जनावरांना खाऊ घालत असणार हे नक्की.

सध्या साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. सगळीकडे ऊस तोड सुरू आहे. अनेक ठिकाणी पशुपालक उसाचे वाढे आपल्या जनावरांना खाऊ घालत असणार हे नक्की.

पण उसाच्या वाढ्यामध्ये पोषणमूल्य आहेत काय? त्याचे परिणाम काय होतात हे मात्र सर्वांना माहीत असतीलच असे नाही. तेच आपण आज जाणून घेऊ.

ऊस वाढ्यातील पोषणमूल्य◾ उसाचे वाढे तसे दिसायला हिरवेगार दिसते. त्यामध्ये आवश्यक अन्नघटक मात्र खूप कमी असतात.◾ इतर हिरव्या वैरणी प्रमाणे उसाचे वाढे जनावरांना पोषक नाही.◾ आहार शास्त्रानुसार तो एक निव्वळ वाळलेला चारा आहे.◾ त्यामध्ये ०.५ ते १.०% प्रथिने ०.५ स्निग्ध पदार्थ आणि ९% तंतुमय पदार्थ (फायबर) असतात.◾ हे सर्व इतर वैरणीतील पोषण मूल्यापेक्षा खूप कमी असल्याने आपण ‘वाळलेला चारा’ असे समजायला हरकत नाही.◾ तथापि आज या काळात अगदी घरपोच म्हटले तरी चालेल हे ऊसवाढे तीन-चार महिने उपलब्ध होते.◾ पशुपालकाचे चारा पिकाबाबत नियोजन नसल्यामुळे अनेक पशुपालक या ऊस वाढ्याचा उपयोग आपल्या सर्व जनावरांसाठी चारा म्हणून करतात. 

ऊस वाढ्याचा जनावरांना होणार परिणाम◾ ऊस वाढ्यात मुळातच पोषणमूल्य कमी असल्याने दूध उत्पादन घटते.◾ गाभण जनावरांना खाऊ घातल्याने पोटातील वासरास आवश्यक ते पोषक घटक मिळत नाहीत. त्यामुळे वासराची वाढ नीट होत नाही.◾ गायीच्या शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरस याचे प्रमाण बिघडते व शेवटी गर्भपात होऊ शकतो.◾ ऊस वाढ्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्झलेट व नायट्रेट असते.◾ त्यामुळे शरीरातील कॅल्शियम बरोबर त्याचे रासायनिक संयोग होतो व कॅल्शियम ऑक्सालेट तयार होते. ते लघवी व शेणावाटे बाहेर फेकले जाते.◾ दूध उत्पादन व शारीरिक वाढीसाठी कॅल्शियमचे खूप महत्त्व आहे. तेच शरीराबाहेर फेकले गेले तर कॅल्शियमची कमतरता निर्माण होते. त्यामुळे दूध उत्पादन घटते.◾ जनावर वेळेवर गाभण राहत नाहीत. वारंवार उलटतात. अनेक वेळा गाभडतात त्यामुळे पशुपालकाचे खूप मोठे नुकसान होते.

ऊस वाढ्यावर प्रक्रिया करून त्याचा वापर◾ खरोखरच आपल्याला ऊस वाढे खायला घालायचे असेल तर मात्र सोबत इतर सकस आहार, वैरण व सोबत ४० ते ५० ग्रॅम उच्च दर्जाचे खनिज मिश्रण प्रति मोठ्या जनावरास नियमित द्यावे.◾ साधारण दहा ते पंधरा किलो ऊस वाढ्यावर एक ते दिड लिटर चुन्याची निवळी शिंपडावी. रात्रभर तसेच ठेवून सकाळी खाऊ घालावे.◾ आज काल अनेक मंडळी ऊस वाढ्यापासून मुरघास करताना दिसतात. मुरघास करायला हरकत नाही. अडचणीच्या वेळी त्याचा वापर होऊ शकतो.◾ मुरघास तयार करताना मळी किंवा गुळाचे पाणी, युरिया व मीठ तज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्याने वापरावे.◾ त्यामुळे ऊस वाढ्याचा मुरघास पौष्टिक व सकस होईल आणि अशा मुरघासामुळे शारीरिक नुकसान कमी होऊन आर्थिक फायदा होईल.

अशा पद्धतीने जर सर्वांनी काळजी घेतली तर निश्चितपणे ऊस वाढे देखील वैरण म्हणून वापरता येईल. पशुपालकांचे नुकसान देखील टाळता येईल.

सोबत इतर चांगल्या वैरणीसाठी क्षेत्र राखून ठेवावे. त्यामध्ये चांगल्या प्रकारची चारा पिकं  घेऊन त्याचे नियोजन केले तर तो खूप चांगला निर्णय ठरू शकतो.

- डॉ. व्यंकटराव घोरपडेसेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली

अधिक वाचा: Janavrantil Gochid Tap : जनावरांतील गोचीड ताप वेळीच ओळखा आणि अशा करा उपाययोजना

टॅग्स :दुग्धव्यवसायगायदूधशेतकरीऊससाखर कारखाने