आपण अनेक वेळा आपल्या भागात जनावरांची शस्त्रक्रिया करून दहा पंधरा किलो किंबहुना त्यापेक्षाही जास्त प्रमाणात प्लास्टिक काढल्याचे वाचतो, पाहतो. सोबत अनेक वेळा लोखंडाच्या वस्तू देखील बाहेर काढल्याचे पाहायला मिळते.
खरंतर हा प्रकार आपल्याला मुख्यत्वे बाहेर फिरणाऱ्या भटक्या जनावरात किंवा ज्या ठिकाणी कुरणात बाहेर चरायला सोडले जाते अशा जनावरात आढळून येते. त्यातही गाई म्हशीमध्ये याचे प्रमाण जास्त आहे.
शेळ्या मेंढ्यांच्या मध्ये याचे प्रमाण कमी आहे. गोठ्यात असणाऱ्या जनावरांत देखील अनेक वेळा चुकून प्लास्टिक सह लोखंडी वस्तू पोटात जातात. त्याचे योग्य निदान करून ते बाहेर देखील काढले जाते.
जनावरे अखाद्य वस्तू का खातात?
१) जनावरे अखाद्य वस्तू खाण्याचे मुख्य कारण हे योग्य पोषणमुल्य असणाऱ्या पशुखाद्यचा, वैरणीचा आहारात समावेश नसणे हा आहे.
२) अनेक वेळा पशुपालकांचा हलगर्जीपणा सुद्धा कारणीभूत आहे.
३) मोठ्या प्रमाणामध्ये आपण वापरत असलेल्या प्लास्टिकच्या वस्तू हे देखील तितकेच कारणीभूत आहे.
४) आहारात विशेषता फॉस्फरस, कॅल्शियम या घटकाची कमतरता निर्माण झाली की जनावर अखाद्य वस्तू चघळणे, खाणे असे प्रकार करतात. ५) मुख्यत्वे जमिनीत मोठ्या प्रमाणात स्फुरद (फॉस्फरस) ची कमतरता आहे.
६) पशुपालक कारखाने सुरू झाले की ऊस वाढे खाऊ घालतात.
७) त्यामुळे फॉस्फरस सह कॅल्शियमची मोठ्या प्रमाणात शरीरात कमतरता निर्माण होते. मग जनावरे अशा अखाद्य वस्तू खाताना दिसतात.
पशुपालकांच्या चुका
१) पशुपालक देखील पशुखाद्य विशेषता पेंड घालताना ती योग्य तपासून घालत नाहीत.
२) गोठ्यामध्ये दावणीच्या वरती खुंटी, दिवळी असते. त्यामध्ये घरातील नको असलेल्या वस्तू ठेवल्या जातात. त्या चुकून दावणीत पडून पोटात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
३) अनेक वेळा घरी राहिलेले शिळे अन्न टाकायला प्लॅस्टिकची पिशवी वापरली जाते. ते भटकी जनावरे खातात.
जनावरे अखाद्य वस्तू खाल्ल्यानंतर दिसणारी लक्षणे
१) प्लास्टिक सह अनेक वस्तू पोटात गेल्यानंतर रवंत करताना व पोटातील वायू बाहेर टाकताना एक प्रकारचा अडथळा निर्माण होतो.
२) पोट फुगायला सुरुवात होते.
३) वैरण कमी खातात. दूध उत्पादन घटते.
४) प्लास्टिकच्या वस्तू पोटात साठतात. लोखंडी वस्तू जर अणकुचीदार असतील तर ओटीपोटाच्या हालचालीमुळे त्या वस्तू हृदयाकडे किंवा इतर बाजूला सरकण्याची शक्यता असते. या सर्व वस्तू पुढे जाऊन जाळी पोटात थांबतात.
५) साठलेल्या प्लास्टिक मुळे अन्नपचन नीट होत नाही.
६) सामु बदलतो, पोट दुखते, शेण कमी टाकते अशी अनेक लक्षणे दिसायला सुरुवात होते.
७) मुख्य म्हणजे अशा जनावरांचा एक्स-रे काढल्यानंतर त्यामध्ये प्लास्टिक च्या वस्तु दिसून येत नाहीत. फक्त लोखंडी वस्तू दिसून येतात.
उपाययोजना
१) हे सर्व टाळण्यासाठी आपल्या जनावरांना सकस व संतुलित आहार द्यावा.
२) नियमित पशुवैद्यकाच्या सल्ल्याने खनिज मिश्रण ने द्यावीत. तेही योग्य प्रमाणात द्यावे.
३) सर्व भाग, परिसर हा प्लॅस्टिक मुक्त ठेवावा.
४) इतके करूनही जर अशा आखाद्य वस्तू पोटात गेल्याचे निदान झाले तर मात्र तज्ञ पशुवैद्यकाकडून शस्त्रक्रिया करून घ्यावी व आपले बहुमोल पशुधन वाचवावे.
- डॉ. व्यंकटराव घोरपडे
सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली
अधिक वाचा: गाय म्हैस व्याल्यानंतर चारा खाते, रवंथ करते पण भरडाच खात नाही; असू शकतो हा आजार? त्वरित करा उपचार