उन्हाळा खूप जाणवू लागला आहे. आपल्याला जसे नियमित शुद्ध आणि पुरेसे पाणी प्यावे लागते त्याप्रमाणे जनावरांना देखील शुद्ध पुरेसे पाणी नियमित देणे अत्यंत आवश्यक आहे.
दूध उत्पादन आणि जनावरांच्या आरोग्याच्या दृष्टीने पाणी हा खूप महत्त्वाचा घटक आहे. दैनंदिन पाण्याचा वापर हा पिण्यासाठी आणि शारीरिक स्वच्छते साठी केला जातो.
जनावरांसाठी पाण्याचे महत्व
◼️ पाण्याची नेमकी गरज पशुपालकांनी ओळखणे खूप महत्त्वाचे आहे.
◼️ हवामानातील बदल, कोणत्या पद्धतीचा आहार आपण देतोय तसेच त्या जनावरांचे दूध उत्पादन किती आहे त्यानुसार पाण्याची गरज बदलत जाते.
◼️ आपण ज्यावेळी जनावरांना कडबा, वाळलेली वैरण देतो त्यावेळी जनावरे ज्यादा पाणी पितात हे चाणाक्ष पशुपालकांना माहीत असते. त्यानुसार ते पाणी देतात.
◼️ मुळातच जादा दूध देणारी जनावरे ज्यादा पाणी पितात. दुधामध्ये जवळजवळ ८८% पाणी असते.
◼️ जनावरांना त्यांचे शारीरिक तापमान योग्य राखण्यासाठी, शरीरातील सर्व अवयवाचे कार्य सुरळीत चालवण्यासाठी पाणी हा घटक खूप महत्त्वाचा आहे.
◼️ रवंथ करणाऱ्या जनावरांच्या अन्नपचनासाठी व त्यावरील किण्वन प्रक्रियेसाठी सोबत योग्य पद्धतीने शोषण होण्यासाठी पाणी फार महत्त्वाचे आहे.
◼️ तसेच शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी व पोटातील आम्लता नियंत्रित करण्यासाठी देखील शुद्ध आणि पुरेशे पाणी जनावरांना उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे.
◼️ अनेक वेळा पाण्याची उपलब्धता वेळेत केली नाही किंवा कमी प्रमाणात पुरवठा केला तर जनावरे आहार कमी घेतात.
◼️ दूध उत्पादन घटते. शेण कडक होते. जनावरांना अशक्तपणा जाणवतो. त्यामुळे पशुपालकांचे अप्रत्यक्षरीत्या खूप नुकसान होते.
जनावरांना पाण्याची गरज
◼️ पूर्ण वाढ झालेल्या मोठ्या निरोगी जनावरांला दररोज ७० ते ८० लिटर पाणी पिण्यासाठी लागते.
◼️ २० ते २५ लिटर पाणी जनावरांना धुण्यासाठी आपण वापरू शकतो किंवा गोठ्यातील वातावरण थंड करण्यासाठी फॉगर, सभोवतालचे शेडनेट ओले करण्यासाठी देखील वापरता येते.
◼️ कमीत कमी उन्हाळ्यात म्हशींना दिवसातून दोन वेळा पाण्याने अंघोळ घालणे योग्य राहील.
◼️ दुधाळ जनावरांना एक लिटर दूध उत्पादनासाठी साधारण अडीच ते तीन लिटर पाणी पाजणे आवश्यक आहे.
◼️ पाणी नेहमी स्वच्छ व चवदार असावे. अस्वच्छ व प्रदूषित पाणी जनावरांना पाजू नये.
◼️ पाणी साठवण्यासाठी बांधलेले हौद, पाण्याच्या टाक्या नेहमीच स्वच्छ कराव्यात. पंधरा दिवसातून एकदा चुण्याने रंगवून घ्यावे.
◼️ जनावरांना पाणी पाजताना त्यांचे भांडे, हौद हे उंचीवर असावेत.
◼️ पाणी पिताना त्यांची शेण, लघवी त्यामध्ये मिसळणार नाही याची काळजी घ्यावी.
◼️ पाण्याचा सामु हा नेहमी सातच्या जवळपास असावा.
◼️ ज्यादा अल्कलाइन किंवा ॲसिडिक असू नये.
◼️ सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाणी हे नेहमी व सहज उपलब्ध असावे. जेणेकरून जनावरांना तहान लागली की त्यांना पिता यावे.
◼️ एकाच ठिकाणी बांधून ठेवलेल्या जनावरांना उन्हाळ्यात पाच वेळा हिवाळ्यात तीन वेळा पाणी पाजावे.
शेवटी आपण कितीही चांगला आहार दिला आणि शुद्ध व पुरेसे पाणी दिले नाही तर त्या खाद्याचा परिणाम दिसून येत नाही. त्यासाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. अशाप्रकारे थोडीशी जरी काळजी घेतली तरी आपल्या जनावरांना उन्हाळा सुसह्य होईल.
डॉ. व्यंकटराव घोरपडे
सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली
अधिक वाचा: जनावरांना किरळ लागले हे कसे ओळखावे? व त्यावर तात्काळ काय उपाय करावेत? वाचा सविस्तर