जसं मानवाला आहारामध्ये वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची आवश्यकता असते त्याचप्रमाणे जनावरांना देखील आपल्या आहारामध्ये विविध प्रकारच्या चाऱ्याची आवश्यकता असते. त्यामध्ये प्रोटीन, कर्बोदके, जीवनसत्वे, या गोष्टींचा सामावेश असायला हवा. तर एका जनावरासाठी दिवसभरात किती चारा द्यायला पाहिजे आणि कोणत्या प्रकारचा चारा द्यायला पाहिजे यासंदर्भातील माहिती आपण पाहूया...
दरम्यान, साधारण एका पशूचे (ज्यामध्ये गाय किंवा म्हैस) वजन सरासरी ४०० किलो असेल तर त्यासाठी दररोज २५ किलो चाऱ्याची गरज भासते. त्यापैकी २० किलो चारा हा एकदल चारा प्रकारातील असायला हवा जो प्राण्यांना उर्जा देतो. तर ५ किलो चारा हा प्रथिनेयुक्त असायला हवा.
प्रथिनेयुक्त चाऱ्यामध्ये लसूण घास, मेथी घास, दशरथ घास, चवळी अशा प्रकारच्या खाद्याचा सामावेश असला पाहिजे. तर एकदल चाऱ्यामध्ये उस, मका, कडवळ अशा चाऱ्याचा सामावेश असला पाहिजे. हा चारा २० किलो आणि प्रथिनेयुक्त चारा दररोज एका जनावरासाठी ५ किलो द्यायला हवा. असा एकूण २५ किलो चारा एका पशुसाठी द्यायला हवा.
जनावरांच्या आहारामध्ये प्रथिनेयुक्त चारा आणि एकदल चाऱ्याचे प्रमाण अशा प्रकारे ठेवल्यास जनावरांची शारिरीक वाढ होतेच पण दुधाची प्रत आणि प्रमाणही वाढते. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा प्रकारच्या चारा पद्धतीकडे लक्ष द्यायला पाहिजे जेणेकरून दुधात वाढ होते आणि उत्पन्नात वाढ होते.
माहिती संदर्भ - डॉ. प्रशांत योगी (पशुवैद्यकीय आणि पशुव्यवस्थापन सल्लागार)