बाजारात व्यापारी अथवा पशुपालक शेतकरी यांच्याकडून पशुधन खरेदी करत असताना बऱ्याच वेळी आपली फसवणूक होण्याची शक्यता असते अशावेळी आपण खात्रीशीर पशुपालक व व्यापारी यांच्याकडून खरेदी करणे आवश्यक आहे. आपण पशुधन खरेदी करता असताना कोणकोणते मुद्दे विचारात घेणे आवश्यक आहेत त्यावर आपण नजर टाकूया.
दुधाळ पशुधानांची निवड करताना काय काळजी घ्यावी
- दुधाळ गाय आकाराने मोठी असली तरी शरीराचा बांधा व्यवस्थित असावा.
- वयस्कर गाईचे आकारमान मोठे असते व बांधा सैल असतो.
- गाईच्या अंगावर जास्त चरबी नसावी.
- त्वचा मऊ व तजेलदार असावी.
- मान लांब व सडपातळ असावी.
- पाठीचा कणा सरळ असावा.
- बरगड्या चपटया व रूंद असाव्यात.
- कमरेची हाडे रूंद व दणकट असावीत.
- मांडया पातळ, अर्ध गोलाकार असाव्यात.
- गाय शांत स्वभावाची असावी.
- डोके पुरेसे लांब व रूंद असावे.
- जबडा रूंद व मजबूत असावा.
- डोळे पाणीदार असावे.
- छाती भरदार व रूंद असावी.
- नाकपुड्या रूंद व श्वसन उत्तम असावे.
- चारही सड सारख्या लांबीचे असावेत.
- कास शरीराला घट्ट व मऊ असावी.
- जनावरे दुसऱ्या वेताची निवडावी.
संकरित गाय, म्हैस खरेदी करताना घ्यावयाची काळजी
- संकरित गाय खरेदी करताना फसगत होण्याची शक्यता जास्त असते.
- संकरित गाय खरेदी करताना शक्यतो ओळखीच्या व्यक्तिकडूनच खरेदी करावी.
- गाईची किंमतही तिच्या वयावर अवलंबून असते. पहिल्या किंवा दुसया वेताच्या गाईला चौथ्या किंवा त्या पुढील वेताच्या गाईपेक्षा जास्त किंमत द्यावी लागते.
- पहिल्या किंवा दुसऱ्या वेताच्या गाईची किंमत रु. १५०० प्रति लिटर दूध अशी आहे व वयस्कर गायी १००० ते १२५० रु. प्रति लिटर दूध या किमतीत मिळण्यास हरकत नाही. (परिस्थितीनुसार वेगवेगळी असू शकते)
- गाय खरेदी करण्यापूर्वी त्या गाईला काही व्यंग आहेत का त्याची पाहणी करावी.
- विकत घेणाऱ्या व्यक्तिकडून गाईची चारही सडे चांगली असण्याची व अंग बाहेर न पडण्याची खात्री घ्यावी.
- गाभण गाय असल्यास किती दिवसाने विणार आहे याची खात्री करून घ्यावी जर ती गाय दिलेल्या मुदतीत विली नाही व मुदतीपेक्षा जास्त महिने लागले तर पुढील होणारे नुकसान टळते.
- दुधातील गाय विकत घ्यावयाची असेल तर तिचे तीन वेळेचे दूध स्वत: काढून पाहावे व आपली खात्री करून घ्यावी जर एक वेळचे दूध पाहून गाय खरेदी केली तर आपली फसगत झाली असे समजावे. बरेच दलाल गाय तुंबवतात त्यामुळे एका वेळेला गाय जास्त दूध देत असते.
- १५ ते २० दिवसांत विणारी गाभण गाय शक्यतो खरेदी करावी म्हणजे दूध उत्पादन व्यवसाय किफायतशीर करता येतो. ताजी दुभती गाय विकत घेतल्यास ती आपल्या गोठ्यात गेल्यावर २ ते ३ लिटर दूध कमी देईल.
- गाय लंगडत नाही ना याची खात्री करावी.
- शक्य असल्यास तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गाय खरेदी करा.
- गाय खरेदी केल्याबरोबर गाईचा विमा उतरविण्यास विसरू नका.
- दुभत्या जनावरांचे वय दातावरून व शिंगावर असणाऱ्या रिंगावरून ओळखता येते.