दुग्धोत्पादनामध्ये वासरांचे आरोग्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. वासरांना त्यांच्या वयाच्या साधारणपणे चार ते सहा महिन्यांपर्यंत रोगांचा प्रादुर्भाव जास्त होतो. त्यामुळे त्यांचे रोगनियंत्रण करणे, योग्य वेळी करणे गरजेचे असते.
वासरांच्या रोगनियंत्रणासाठी महत्त्वाच्या बाबी
१) ऋतुमानानुसार योग्य काळजी घ्यावी.
२) गोठा स्वच्छ व हवेशीर ठेवावा.
३) गोठ्याची रचना योग्य प्रकारे करावी, जेणेकरून गोठा स्वच्छ व कोरडा राहील.
४) वासरे एकमेकांना चाटणार नाहीत यासाठी त्यांना वेगवेगळे बांधावे.
५) वासराची विष्ठा किंवा शेण ताबडतोब काढून गोठ्याचा पृष्ठभाग निर्जंतुकाने स्वच्छ करावा.
६) वासरू जन्मतःच नाळ बेंबीपासून दोन इंच अंतरावर कापून, शरीरालगतची नाळ तीव्र टिंक्चर आयोडीनमध्ये बुडवून स्वच्छ धाग्याने बांधून टाकावी.
७) वासरू जन्मतःच त्याचा श्वासोच्छ्वास चालू असल्याची खात्री करून नंतर त्याचे नाक व तोंड स्वच्छ करावे.
८) वजनाच्या १/१० याप्रमाणे वासराला जन्मतः चीक दररोज चार ते पाच दिवस पाजावा.
९) आजारी वासरास निरोगी वासरापासून वेगळे करून त्याची स्वतंत्रपणे काळजी व व्यवस्था करावी.
१०) वासराच्या वयाच्या १५ दिवसांच्या आत शिंगांचे कोब जाळून घ्यावे, जवळच्या भागातील केस कापून घ्यावेत.
११) जाळलेला कोंब पूर्णपणे जळाल्याची खात्री झाल्यास त्यावर बोरिक पावडर, झिंक ऑक्साईड व मोरचूद मिश्रण लावावे.
१२) वयाच्या एक महिन्याच्या दरम्यान पहिला कृमिनाशक डोस, नंतर दर महिन्याने असे वयाच्या सहा महिन्यांपर्यंत द्यावे. प्रत्येक वेळी कृमिनाशक बदलून द्यावे.
१३) वयाच्या दोन महिन्यानंतर लाळ्या खुरकूत रोग तसेच पशुवैद्यकाच्या सल्ल्याने घटसर्प, फऱ्या इ. रोगांविरूद्ध लसीकरण करून घ्यावे.
१४) वासरांना समतोल पौष्टीक आहार वयानुसार द्यावा.
अधिक वाचा: Murghas : खड्डा पद्धतीने मुरघास कसा बनवावा? वाचा सविस्तर