सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. या हंगामात शेतकऱ्यांना अनेक समस्या उद्भवतात, त्यापैकी एक म्हणजे डासांची समस्या. या काळात डासांची पैदास होते आणि डस चावल्याने डेंग्यूसारखे आजारही होऊ शकतात. मनुष्याप्रमाणेच गायी-गुरांनाही डासांचा त्रास होतो. त्याचा परिणाम दुधाच्या उत्पादनावरही होऊ शकतो. डासांना पळवून लावण्यासाठी काही घरगुती उपाय केले, तर ते स्वस्त आणि मस्तही आहेत.
कडुलिंबाची पाने
कडुलिंबाची पाने डासांना घालवण्यासाठी किंवा मारण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. जेव्हा कडुलिंब जळतो तेव्हा एक वास येतो, ज्यामुळे डास दूर होतात. गोठ्यात किंवा जनावरे बांधतात त्या ठिकाणी कडुलिंबाची पाने जाळून धुर करावा. त्यानंतर हे डास पळून जातात. विशेषत: सायंकाळी हा उपाय करून पाहावा.
कापूर जाळणे
कापराचा वास डासांना त्रास देऊ शकतो. त्यासाठी कापूर गोठ्याच्या कोपऱ्यात जाळायचा आहे. असे केल्याने गोठ्यातील सर्व डास मरतात. राहत्या घरातही हा उपाय करून पाहायला हरकत नाही. मात्र हा उपाय करताना घराच्या दारे-खिडक्या काही काळ बंद ठेवा.
अंड्याच्या क्रेटचा धूर
गोठ्याच्या परिसरात किंवा राहत्या घराच्या परिसरात खूप डास असतील, तर हा उपाय करून पाहा. अंड्याचे कागदी क्रेटचा हा उपाय आहे. अंड्याचे क्रेट जाळून धूर करावा लागेल. त्यामुळे आजूबाजूला असलेले डास पळून जातील.
गोठे स्वच्छ ठेवा
डासांची पैदास होऊ नये म्हणून जनावरांच्या गोठ्यात पाण्याची डबकी साचू देऊ नका. गोठ्याच्या बाजूलाही साफसफाई आणि कोरडेपणा ठेवा. या खड्ड्यातील पाण्यामुळे डासांची पैदास वाढते.
खाद्य तेल
शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या घरात डास असतील किंवा घराबाहेर डास चावत असतील तर तुम्ही थंड तेल अंगाला लावू शकता. डासांना थंड तेलाचा वास आवडत नाही, त्यामुळे ते तुमच्या जवळ येत नाहीत.