या पध्दतीच्या गोठ्यात गायी/म्हशींना एकाच ठिकाणी बांधून न ठेवता दिवसरात्र मोकळेच सोडलेले असते. फक्त धारा काढते वेळी स्वतंत्र दोहनगृहात नेवून धारा काढल्या जातात. बंदिस्त आवाराचे एका किंवा दोन्ही बाजूस आच्छादीत गोठा असतो व त्यात चारा व निवाऱ्याची सोय असते.
गोठ्यासमोरील मोकळी जागा सर्व बाजूनी ४ फुट उंचीची भिंत उभारुन अगर कुंपन घालून बंदिस्त केलेली असते. या मोकळ्या जागेत गाई/म्हशी मुक्तपणे फिरतात. गोठ्यातील गव्हाणीत चारा घालण्याची व्यवस्था असते तर पाण्याची सोय गोठयात मोकळ्या जागेत हौद बांधून केलेली असते.
चारा व पाणी दिवसभरमिळेल याची काळजी घेतली जाते. संशोधनाअंती प्रचलीत पध्दतीच्या गोठ्यापेक्षा मुक्त पध्दतीच्या गोठ्यातील गायांच्या/म्हशींच्या दुधउत्पादनात वाढ झालेली आढळली. तसेच प्रजननातही सातत्य दिसून आले आहे.
गोठा व गव्हाणीची जागा
गव्हाणीची रूंदी (सें.मी.) | गोठ्यातील आवश्यक जागा (चौ.मी.) | गव्हाणीची रूंदी (सें.मी.) |
गाय | ३.५ | ६० |
म्हैस | ४.० | ६० |
वळू | १२.० | ६० |
बैल | ३.५ | ६० |
गाभण जनावरे | १२.० | ६० |
मोठी वासर | २.० | ४० |
लहान वासरे | १.० | ३० |
गोठ्याचे बांधकाम
निरनिराळ्या जनावरांचे गोठे मजबूत, टिकाऊ, शास्त्रीय पध्दतीने बांधकाम करुन आर्थिकदृष्ट्या परवडणारे असावेत. त्यासाठी खालील बाबीवर बारकाईने लक्ष देणे फायदयाचे असते.
गोठ्याची जागा
या जागेवर गोठा करावयाचा आहे तेथील जमीन कठीण, टणक आणि कोरडी असणे आवश्यक आहे. बसण्यास सिमेंट काँक्रीट, भाजलेल्या विटा किंवा दगडी फरशी यांचा उपयोग करता येतो. गोठ्यातील जमीन थोडी खरबडीत ठेवावी. त्यामुळे जनावरे घसरुन पडत नाहीत. जनावरास केवळ उभे राहण्यासाठी ५ ते ५.५ फुट जागा लागते. तसेच जनावरे बांधावयाचे दोन कप्यातील अंतर ४ फुट असावे गोठ्यातील जमिनीस गव्हाणीकडून एक ते दीड इंच उतार दिलेला असावा.
गव्हाण
प्रत्येक जनावरास पोटभर चारा मिळण्यासाठी प्रमाणशीर गव्हाण असणे महत्वाचे आहे. सर्वसाधारण गव्हाणीची उंची २० ते २४ इंच, रुंदी २४ इंच आणि खोली १५ इंच असावी, मजबूत गव्हाण तयार करण्यासाठी दगडी फरशी, लाकडी जाड फळ्या, सिमेंट काँक्रीट इत्यादीने बनविलेली असावी. संपूर्ण लांबीची गव्हाण साफ करण्यासाठी सोईची असते. गव्हाणीच्या जनावराकडील बाजूस पूर्ण लांबीचे लोखंडी पाईप काँक्रीटमध्ये बसविल्यास जनावरांनी घासले तरी काठ तुटू शकत नाहीत. गव्हाणीचा पृष्ठभाग गुळगुळीत आणि काठ गोलाकार असावेत.
भिंती
भिंतीचा उपयोग प्रामुख्याने थंड वारा, पाऊस यापासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी होतो व छताला आधारही मिळतो. मुक्त गोठा पध्दतीत भिंतीची उंची ४ फुट असावी. हवामान व बांधकाम साहित्याची किंमत याचा विचार करुन भिंतीसाठी दगड, माती, विटा, सिमेंट, लाकडी, लोखंडी किंवा काँक्रीट खांब इ. वापर करावा.
छत
गोठ्यावरील छत वजनाने हलके, कठीण व टिकावू असावे. तसेच ते मंदउष्णवाहक असावे. जास्त पावसाचे भागात अधिक उतरत्या छपराचे गोठे असावेत. अधुनिक पध्दतीच्या गोठ्यावर सिमेंटचे पन्हाळी पत्रे, ॲसबेसटॉस पत्रे इत्यादीचा छतासाठी वापर करावा. छताची उंची बाहेरील भिंत/गव्हाणीच्या बाजूने २. १० मीटर असावी व दुसरी बाजू २.८० मीटर उंच असावी. छताची रुंदी साधारणपणे ३ मीटर असावी.
शेणमूत्र गटारे
गोठ्यातील शेणमूत्र आणि सांडपाणी व्यवस्थित वाहून जाईल आणि सफाई व्यवस्थित करता येईल अशाप्रकारचे गटार असावे. त्याला लांबीच्या प्रमाणात १:४० असा योग्य उतार दिलेला असावा. गटारीची रुंदी २५ ते ३० सें.मी. असावी.
पाण्यासाठी हौद
गोठ्यातील सर्व जनावरांना ताजे व स्वच्छ पाणी सदैव उपलब्ध असावे. दुभत्या जनावरांना पाण्याची गरज अधिक असते. यासाठी स्वतंत्र हौद किंवा काँक्रीट टाक्या पक्या बांधून घ्याव्यात. त्यात स्वच्छ, ताजे पाणी दररोज भरण्यात यावे. आठवड्यातून एकदा हौद व टाक्या मोकळ्या करुन स्वच्छ धूवून चूना लावावा. हौदाची उंची साधारणपणे ६५ ते ७५ सें.मी. असावी जेणेकरुन सर्व लहान मोठ्या जनावरांना सुलभरित्या पाणी पिता येईल. हौदावर सावलीची सोय असल्यास अधिक उत्तम असते. त्यामुळे पाणी थंड राहते व शेवाळ कमी प्रमाणात होते.
अधिक वाचा: दुध उत्पादन वाढवायचय; एक लिटर दूध देण्यासाठी हवंय इतके लिटर पाणी