Join us

उन्हाळ्यात दुधाळ जनावरांचे दूध कमी होऊ नये यासाठी त्यांना कसा द्यावा आहार? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 14:41 IST

उष्णतेमुळे जनावरांची आहार व पाण्याची गरज वाढते. यासाठी उन्हाळ्यात जनावारांचे खाद्य व्यवस्थापन कसे करायचे ते सविस्तर पाहूया.

पशुधनाचे आरोग्य अबाधित ठेवून प्रजोत्पादन व दूध उत्पादनावर होणारा विपरीत परिणाम टाळावयाचा असेल तर उन्हाळ्यात जनावारांचे खाद्य व्यवस्थापन याकडे लक्ष देणे अत्यंत महत्वाचे आहे.

उन्हाळ्यात जनावरांचे कसे कराल आहार व्यवस्थापन?

  • उन्हाळ्यात वातावरणातील वाढते तापमान लक्षात घेता हिरवे, पाचक व पोषणद्रव्ययुक्त संतुलित आहार जनावरांना देणे आवश्यक आहे.
  • हिरव्या चाऱ्याचा समावेश मोठ्या प्रमाणात करणे व शुष्क, कोरडा आहार कमी करणे गरजेचे आहे.
  • मात्र परिस्थिती अगदी भिन्न असते जेथे पिण्याचे पाणी उपलब्ध करणे कठीण होऊन बसते तेथे हिरवा चारा उत्पादन करून जनावरांसाठी उपलब्ध करून देणे अशक्यप्राय होते व जो काही चारा उपलब्ध असतो तो अतिशय शुष्क/कोरडा स्वरुपाचा असतो. जो मुळातच कमी पाचक असतो. तो पचविण्यासाठी अधिक पाणी व ऊर्जा लागते, जी अगोदरच उष्णतेच्या दाहकतेने कमी झालेली असते.
  • उष्णतेने शरिरामधून पाणी मोठ्या प्रमाणात घामाच्या स्वरुपातून विसर्जित होते, ज्याद्वारे सोडियम, पोटॅशिअम इ. घटक कमी होतात व शरिरातील ताणतणाव वाढतो.
  • अशावेळी उपलब्ध कोरडा चारा ज्वारी/मका कुट्टी, गव्हांडा, भात पेंढा, सोयाबीन कुटार इ. २ टक्के मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया योग्य ठरते. ज्यामुळे साधारणपणे १०० किलो कुटारासाठी ४० ते ५० लिटर पाण्यामध्ये २ किलो मीठ मिसळून द्रावण तयार करा. हे द्रावण १०० किलो कुट्टी / कुटार यावर शिंपडून चांगले मिसळवा. ओले करा व रात्रभर प्लॅस्टीक आच्छादन वापरुन दाबून ठेवा. दुसऱ्या दिवशी जनावरांना द्या. ज्यामुळे चारा मऊ होऊन पाचकता वाढेल. मिठामुळे चव वाढून जनावर ते चघळून खातात. यामुळे शुष्क चाऱ्यांचे खाण्याचे प्रमाण वाढेल सोबतच जनावर मिठामुळे पाणी अधिक प्रमाणात ग्रहण करेल. मीठ व पाणी उन्हापासून शरीराचे संरक्षण करण्यास उपयुक्त ठरेल.
  • हिरवा चारा उन्हाळ्यात शक्य नसेल तरी नैसर्गिकरित्या उपलब्ध होणारा विविध वृक्षांचा पाला आपण जनावरांच्या आहारात समाविष्ट करु शकता. उदा. अंजन, पिंपळ, वड, निम, चिंच, बिनकाट्याचे निवडुंग, जांभूळ, बाभूळपाला व शेंगा, सुबाभूळ, दशरथ, आवळा, इ.
  • जनावरांना सरकी ढेप अलाप देताना ते तसेच न देता थोडे मीठ व खनिज मिश्रण (२० ते ३० ग्रॅम प्रति जनावर) मिसळून पाण्यात दोन तास भिजवून नंतर द्या.
  • घरच्या घरी विविध लो ग्रेड खाद्यान्न, धान्य जाडसर भरडून त्यामध्येदेखील मीठ, खनिज मिश्रण मिसळून व भिजवूनच जनावरांना देणे अधिक योग्य राहील.

अधिक वाचा: उन्हाळ्यात जनावरांना पिण्यासाठी दिवसाला किती पाणी लागते? व ते कसे द्यावे? वाचा सविस्तर

टॅग्स :दुग्धव्यवसायगायदूधपाणीअन्नशेतकरीमकातापमानहवामान अंदाज