दर्जेदार दूध उत्पादनासाठी हिरव्या चाऱ्याची गरज आज अत्यंत महत्त्वाची वाटत आहे. यासाठी जनावरांना हिरवा चारा मिळणे आवश्यक ठरते. जर शेतकऱ्यांना त्यांची जनावरे निरोगी असावीत आणि त्यांच्याकडून अधिक दूध उत्पादन मिळावे अशी इच्छा असेल तर वर्षभर हिरव्या चाऱ्याचा समावेश त्यांच्या आहारात असणे फार महत्वाचे आहे.
आपण जनावरांच्या हिरव्या चाऱ्यासाठी अजूनही कमी पडत आहोत. द्विदलवर्गीय चारा पिकांतून जसे बरसीम, चवळी, स्टायलो, दशरथ गवत ही द्विदल चारा पिके जनावरांना चांगल्या प्रकारची खनिजे तसेच जास्त प्रमाणात प्रथिनांचा पुरवठा करतात. त्यामुळे दूध उत्पादन वाढते व महागडे पशुखाद्य कमी प्रमाणात वापरावे लागते.
मका हा हिरवा चारा जनावरास पचनासाठी सोपा तसेच त्याची चवसुद्धा चांगली असल्याने जनावरांच्या शरीरास हितकारक असतो. यामधून जनावरांना ताजी, पोषक द्रव्ये नैसर्गिक स्वरुपात मिळतात. दुग्ध उत्पादनामध्ये जास्त खर्च हा पशु आहारावर होत असतो.
पशुखाद्यामध्ये ज्वारी, बाजरी, चुरी तसेच सरकी ढेप, गव्हाचा किंवा तांदळाचा कोंडा यांचा योग्य प्रमाणात वापर करून पशुखाद्य तयार करता येते.दुधामध्ये जे अन्नघटक असतात ते दुधाळ जनावरांच्या शरीरातूनच पुरविले जातात.
महत्वाचे म्हणजे गायीची जास्तीत जास्त दूध देण्याची मर्यादा किंवा तिची दूध उत्पादन करण्याची क्षमता ही आनुवंशिकतेने येत असते. त्यामुळे जास्त दूध देण्याची क्षमता गायीच्या अंगी नसेल तर तिला कितीही चांगले खाऊ घातले तरी जास्त दूध देऊ शकणार नाही.
उन्हाळ्यातल्या परिस्थितीत हिरव्या चाऱ्याची कमतरता असते. या काळात आपल्याला जनावरांच्या आरोग्य व्यवस्थापनासाठी हिरवा चारा व पूरकखाद्य तयार करणे हे आवश्यक आहे.
अशा प्रकारे चाऱ्याचे नियोजन करून चाऱ्यावर प्रक्रिया करून जनावरांसाठी मुक्त संचार गोठ्याचा वापर केल्यास जनावरे सांभाळणे सोपे होऊन पशुपालकांच्या उत्पादनामध्ये खूप वाढ होईल.
दुधाळ जनावरांसाठी चारा व्यवस्थापन
जनावरांच्या शरीरातील उर्जा वाढविण्यासाठी, शरीरिक वाढ, तंदूरूस्ती व स्वास्थ्यासाठी खाद्याची गरज असते. म्हणून खाद्यात पुरेशी उर्जा, शरिराला लागणारी प्रथिने, क्षार व आवश्यक असणारी पोषकतत्त्वे यांचा समावेश पाहिजे. तसेच पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी काही घटकही आहारात असावे लागतात.
जनावरांना द्या हिरवा व सुका चारा
• हिरव्या चाऱ्यामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो. हिरवा चारा जनावरांना चविस्ट लागतो.
• हिरव्या चाऱ्याद्वारे जनावरांना आवश्यक प्रथिने, जीवनसत्वे मिळतात व त्यांचा परिणाम दुध उत्पादन वाढीवर होतो.
• तसेच हिरवा चारा पोषण आहार व उत्पादन दोन्हीसाठी फायद्याचा ठरतो. वाळलेल्या किंवा सुक्या चाऱ्याचा उपयोग पोषण आहारासाठी होतो.
• वाळलेला, साठवणूक केलेला चारा मुख्यत्वे हिवाळ्यात व उन्हाळ्याच्या सुरूवातीला वापरण्यात येतो.
• या वाळलेल्या किंवा सुक्या चाऱ्यांमध्ये पोषकतत्त्वे कमी प्रमाणात असतात.
• अशा चाऱ्याला युरिया, मिठ मिनरल मिश्रण व गुळ यांची प्रक्रीया करून त्याचे पोषणमुल्य सुधारले जाऊ शकते.
• ज्यामुळे जनावरांना हिरवा चारा उपलब्ध नसेल अशावेळी पुरेसा पौष्टीक चारा मिळेल व चाऱ्याची कमतरता भासणार नाही.
अधिक वाचा: आहो ऐकलं का.. पशुधनाच्या कानात बिल्ला मारून घेतला?