आपण पशुपालकांची प्रत्यक्ष कृत्रिम रेतन प्रक्रियेतील जबाबदारी जाणून घेतल्यानंतर नेमकी 'तांत्रिक' जबाबदारी काय आहे हे जाणून घेऊया.
- योग्य प्रकारचे व्यवस्थापन, संतुलित आहार असेल तर वारंवार जनावर न उलटता गाभण राहण्याची टक्केवारी वाढते.
- प्रत्येक जनावरांच्या माजाची लक्षणे वेगवेगळी असू शकतात त्यांचे योग्य निरीक्षण करून त्यावरून योग्य माजाचे जनावर ओळखून कृत्रिम रेतन करून घ्यावे.
- मुक्त संचार गोठ्यात माजावर आलेले जनावर त्याच्या बाह्य लक्षणावरून व वागणुकीवरून तात्काळ ओळखता येते. त्यामुळे शक्यतो मुक्त संचार गोठ्यात जनावराचे संगोपन करावे. त्यासोबत इतर फायदे देखील भरपूर आहेत.
- गाय म्हैस व्याल्यानंतर म्हैशी कमीत कमी तीन महिन्यात व गाई कमीत कमी दोन महिन्यात माजावर यायला हव्यात न आल्यास त्याची तज्ञ पशुवैद्यकाकडून तपासणी करून घ्यावी.
- साधारणपणे कालवडी, रेड्या यांनी वेळेत व योग्य पहिला माज दाखवण्यासाठी कालवडीचे वजन २५० किलो तर रेडी चे वजन २७५ किलो पर्यंत असायला हवे. त्यासाठी आपल्याला योग्य तो सकस आहार व जंतनाशके वेळेवर देणे आवश्यक आहे.
- कालवड व रेडी माजावर आल्यानंतर तात्काळ कृत्रिम रेतन न करता ज्यावेळी नियमित २०-२२ दिवसानंतर सलग माज दाखवायला सुरूवात करेल तेव्हाच कृत्रिम रतन करून घ्यावे.
- माजाची अनियमित लक्षणे, खराब सोट किंवा माजाची ठळक लक्षणे जनावर दाखवत नसेल तर पशुवैद्यकाची मदत घ्यावी.
- ज्यावेळी जनावर माजावर येते त्यावेळी त्याचा सोट हा पारदर्शक अंड्याच्या बलका सारखा तसेच काचेसारखा रंगहीन व लोंबकळता असावा. त्याच वेळी केलेले कृत्रिम रेतन हे फलदायी ठरते.
- एकदा कृत्रिम रेतन केल्यानंतर जर पुन्हा बारा तासांनी माजाची लक्षणे दाखवत असेल तर तज्ञ पशुवैद्यकाचा ताबडतोब सल्ला घ्यावा.
- कृत्रिम वेतन केल्यानंतर माजाचा काळ संपल्यावर एक प्रकारचा थकवा शरीरात निर्माण होतो. तो भरून काढण्यासाठी पोषक आहार व खनिज मिश्रणे दिल्यास त्याचा चांगला फायदा होतो.
- फार कमी वयात माज दाखवल्यास कृत्रिम रेतन करून घेऊ नये. तथापि वर उल्लेख केल्याप्रमाणे वजन असेल तर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने कृत्रिम वेतन करून घ्यावे.
- कृत्रिम रतन केल्यानंतर कमीत कमी ६० ते ९० दिवसांनी गर्भधारणा तपासणी करूनच खात्री करावी व त्याप्रमाणे नोंद आपल्या नोंदवहीत करून पशुवैद्यकांना कानातील बारा अंकी नंबरवर 'भारत पशुधन ॲपवर' ऑनलाईन नोंद करण्याबाबत आठवण करून द्यावी. त्याचा फायदा आपल्याला होईल.
डॉ. व्यंकटराव घोरपडे
सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली