Join us

पावसाळ्यात पशुखाद्यासह वैरणीची कशी घ्याल काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 9:16 AM

पावसाळ्यात देखील पावसाचे पाणी थेट गोठ्यात येणार नाही त्या ठिकाणी ठेवलेला चारा पशुखाद्य भिजणार नाही याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. पावसाळ्यात पशुखाद्यावर बुरशी वाढून त्यापासून जनावरांना विषबाधा होऊ शकते.

पावसाळ्यापूर्वी जनावरांच्या गोठ्याबाबत अनेक वेळा आपण जी काळजी घ्यायला हवी ती क्वचितच घेताना दिसतो. मान्सूनपूर्व गोठा शेकरणे, छिद्रे पडलेली पत्रे बदलणे, छताला गळती असेल तर ती थोपवणे या बाबीकडे दुर्लक्ष होते.

पावसाळ्यात देखील पावसाचे पाणी थेट गोठ्यात येणार नाही त्या ठिकाणी ठेवलेला चारा पशुखाद्य भिजणार नाही याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. पावसाळ्यात पशुखाद्यावर बुरशी वाढून त्यापासून जनावरांना विषबाधा होऊ शकते.

अनेक वेळा ही विषबाधा पशुपालकांच्या लक्षात येत नाही. यामुळे अनेक जनावरांचे दूध उत्पादन घटते. त्यांची प्रतिकारशक्ती देखील कमी होते. मुळातच पावसाळ्यामध्ये थेट सूर्यप्रकाश जनावरांना न मिळाल्यामुळे 'ड' जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण होऊन प्रतिकारशक्ती कमी झालेली असते.

सोबत नाही म्हटलं तरी खाण्यापिण्याची आभाळ देखील पावसाळ्यात होत असते. त्यामुळे इतर अनेक आजारांना ते बळी पडू शकतात. पावसाळ्यात जर पशुखाद्य भिजले तर त्याचे त्यामध्ये असणाऱ्या पेंडीमुळे त्यावर अस्परागस पेरासाईटीकस व अस्परागस फ्लावस या बुरशींची वाढ होते.

त्यापासून अफ्लाटॉक्सिन नावाचे विष तयार होऊन ते जनावरात विषबाधा निर्माण करतात. त्याचा उत्पादनासह आरोग्यावर परिणाम होतो. अनेक वेळा गर्भपात देखील होतो. प्रतिकारशक्ती कमी झाल्याने इतर रोगाला बळी पडल्यास मृत्यू देखील ओढावतो. अनेक वेळा पावसाळ्यात अतिवृष्टी व पुरामुळे वैरण आणता येत नाही.

अशावेळी घराजवळ रचलेल्या बडमी मधून वाळलेला चारा, कडबा आपण घालतो. ते घालत असताना देखील त्यावर बुरशीची वाढ झाली आहे का? त्याचा रंग बदलून काळा पडला आहे का? हे सर्व खात्री करूनच जनावरांना खाऊ घालावे.

अनेक वेळा अनेक पशुपालक उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी कमी प्रतीचे धान्य खरेदी करून त्यापासून घरगुती पशुखाद्य बनवत आहेत. सदर धान्य बुरशीयुक्त नसावे याकडे पशुपालकांनी लक्ष देणे आवश्यक आहे.

गोठ्यात पशुखाद्य ठेवताना योग्य काळजी घ्यावी. त्यावर पावसाचे पाणी पडणार नाही, पावसात भिजणार नाही याची काळजी घ्यावी. थेट जमिनीवर पशुखाद्याची पोथी न ठेवता ती उंचावर ठेवावीत. बुरशी वाढणार नाही.

हिरवा चारा देताना देखील योग्य काळजी घ्यावी. पावसाळ्यात कापून आणलेला चारा ओला असतो. तो भिजलेला असतो. असा चारा केव्हाही तसाच न देता सर्व पाणी निथळून गेल्यावर व साधारण कोरडा झाल्यानंतर खाऊ घालावा. बेंगा देखील भिजणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक आहे.

डॉ. व्यंकटराव घोरपडेसेवानिवृत्त सहायक आयुक्त, पशुसंवर्धन

अधिक वाचा : Animal Care Tips : पावसाळ्यात जनावरे का लंगडतात? कशी घ्याल खुरांची काळजी

टॅग्स :दुग्धव्यवसायगायदूधशेतकरीशेतीपीकपाऊसमोसमी पाऊस