Join us

अधिक प्रमाणात हिरवा लुसलुशीत चारा जनावरांना कसा ठरू शकतो घातक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 10:23 AM

पशुपालकांकडे असणाऱ्या गायी-म्हशी, शेळ्या-मेंढ्या यांच्यामध्ये अनेक वेळा गर्भधारणेच्या वेगवेगळ्या टप्प्यात गर्भपात होतो. त्यामुळे वेत वाया जाऊन, दुग्धोत्पादन कालावधी कमी होऊन दूध उत्पादनात मोठी घट होती.

पशुपालकांकडे असणाऱ्या गायी-म्हशी, शेळ्या-मेंढ्या यांच्यामध्ये अनेक वेळा गर्भधारणेच्या वेगवेगळ्या टप्प्यात गर्भपात होतो. त्यामुळे वेत वाया जाऊन, दुग्धोत्पादन कालावधी कमी होऊन दूध उत्पादनात मोठी घट होती.

अनेक वेळा गर्भपात झाल्यानंतर जर योग्य उपचार, काळजी घेतली नाही, तर जनावरांमध्ये वंध्यत्व येऊ शकते. भाकड काळ वाढू शकतो. त्याद्वारे होणारे नुकसानदेखील खूप मोठे असते.

त्यासाठी आपल्या गाभण जनावरांतील गर्भपात आपण टाळणे आवश्यक आहे. मुख्यतः गर्भपात हा असंसर्गजन्य कारणामुळे आणि संसर्गजन्य रोगजंतूमुळे होत असतो.

असंसर्गजन्य गर्भपाताची जी कारणे आहेत त्याबाबत पशुपालकांनी जर काळजी घेतली, विशेष लक्ष दिले, तर गर्भपात टाळता येणे शक्य आहे. त्यामधील प्रमुख कारणांचा विचार केला तर अनेक वेळा आपण शेतात नायट्रोजनयुक्त रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करतो.

त्यामुळे अशा कुरणातील गवतात, शेतातील पिकांत नायट्रेटचे प्रमाण वाढून विषबाधा होते. साधारण नायट्रेटमुळे विषबाधा होत नाही; पण जनावरांनी अशी वैरण खाल्ल्यानंतर पोटातील जिवाणूमुळे त्याचे नायट्राइटमध्ये रूपांतर होऊन त्याची विषबाधा होते व गर्भपात होतो.

ज्यादा नायट्रोजनयुक्त रासायनिक खताच्या वापर केलेल्या शेतातील ज्वारी, मका, ओट, बार्ली ज्यावेळी फुलोऱ्यात येतात, हिरवीगार असतात ते जरी जादा प्रमाणात खाऊ घातले तरी विषबाधा होऊन गर्भपात होतो. त्यामुळे गाभण जनावरांना ३०० पीपीएमपेक्षा जास्त नायट्रेट असणारी वैरण खाऊ घालू नये.

अनेक वेळा आपण कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर करत असतो. अशा कीटकनाशक फवारलेल्या किंवा चुकून वैरणीवर पडलेल्या वैरणी खाऊ घातल्यासदेखील गर्भपात होऊ शकतो.

अनेक वेळा गाभण जनावरे दूध कमी देतात म्हणून त्याच्या आहाराकडे आपण दुर्लक्ष करतो. त्यामुळे अ. ई जीवनसत्त्वाच्या अभावामुळे सोबत लोह, सेलेनियम, आयोडिन या घटकांच्या कमतरतेमुळे गर्भाची वाढ खुंटते. त्यामुळेदेखील गर्भपात होतो. त्यासाठी गाभण जनावरांना योग्य आहार व नियमित खनिज मिश्रणे देणे आवश्यक आहे.

अनेक वेळा जनावरे गोठ्यातील निसरड्या जागेमुळे पडतात, धडपडतात, मार लागतो, जनावरे एकमेकांशी धडकतात, भांडतात. यामुळे पोटावर दुखापत होऊनदेखील गर्भपात होऊ शकतो. त्यासाठी गोठ्यातील जागा कोरडी ठेवून जनावरे घसरणार नाहीत याची काळजी घ्यावी.

पशुपालकांनी अशा जनावरांवर लक्ष ठेवून बाजूला बांधावे. अनेक वेळा वाढलेले वातावरणातील तापमानदेखील गर्भपातास कारणीभूत ठरते. त्यासाठी अशा तापमानात आपण गोठ्यातील व्यवस्थापनात बदल करून त्याचा थेट परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी.

अनेक वेळा गर्भ टिकवून ठेवण्यासाठी जबाबदार असणाऱ्या आवश्यक संप्रेरकाची कमतरता निर्माण होऊन गर्भपात होऊ शकतो. त्यासाठी नियमित पशुवैद्यकांकडून गाभण जनावरांची तपासणी करून घ्यावी.

काही संसर्गजन्य आजारातदेखील गर्भपात होतो. त्यामध्ये ब्रुसेलोसिस, लेप्टोस्पायरोसिस, लिस्टेरिओसिस, व्हिब्रीओसिस या रोगांचा समावेश आहे. त्यासाठी आपण योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

नियमित तज्ज्ञ पशुवैद्यकाकडून उपचार करून घेणे व नियमित गाभण जनावरांचे निरीक्षण करून लक्ष ठेवणे आवश्यक आहे. असे केल्याने निश्चितपणे आपल्याला गर्भपात टाळता येऊ शकतो व होणारे नुकसानदेखील टाळता येते.

डॉ. व्यंकटराव घोरपडे सेवानिवृत्त सहायक आयुक्त, पशुसंवर्धन

अधिक वाचा: पावसाळ्यात पशुखाद्यासह वैरणीची कशी घ्याल काळजी