गाई म्हैस वितना अनेक वेळा अडथळा निर्माण होऊन प्रसुती कष्टमय होते त्याला कष्ट प्रसूती इंग्रजीमध्ये डिस्टोकिया असे म्हणतात. साधारण याचे सरासरी प्रमाण पाच ते सात टक्के इतके आहे.
गाय म्हैस अडल्यानंतर जर योग्य काळजी घेतली नाही तर पशुपालकाचे खूप मोठे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे पशुपालकांनी याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.
प्रसुती प्रक्रिया आणि टप्पे
१) साधारणपणे प्रसुती प्रक्रियेत तीन टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात जनावर अस्वस्थ होते, उठबस करते.
२) दुसऱ्या टप्प्यात वासरू बाहेर टाकण्यासाठी जनावर कळा देते. जोर करून मागील बाजूच्या स्नायूचा वापर करून वासरू बाहेर टाकण्यासाठी प्रयत्न करते आणि वासराला किंवा रेडकाला जन्म देते.
३) तिसऱ्या टप्प्यात ज्याला आपण वार किंवा जार म्हणतो तो बाहेर टाकला जातो. अशा तीन टप्प्यात ही नैसर्गिक प्रसूती होत असते.
४) दुसऱ्या टप्प्यात ज्यावेळी वासरू बराच वेळ बाहेर पडत नाही, पहिली पाणमूठ फुटून प्रथम पाय व पायावर डोके याप्रमाणे कळा जसा जसा वाढत जातात तसे तसे वासरू बाहेर येणे अपेक्षित असते तसे घडताना दिसत नाही.
या सर्व प्रक्रियेला साधारण वीस-पंचवीस मिनिटे लागतात. पण जर या प्रक्रियेत वेळ लागला तर मात्र तज्ञ पशुवैद्यकाचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.
प्रसुती दरम्यान येणारे अडथळे
१) वासराचे वजन व आकारमान, कमरेच्या हाडाचे एकूण आकारमान व सोबत बाह्य योनी मार्गाचे आकारमान या तीन गोष्टीवर मुख्यत्वे करून जनावराची प्रसूती अवलंबून असते.
२) नैसर्गिक प्रसुतीमध्ये पुढील पाय व त्यावर डोके अशा पद्धतीने होत असते. पण अनेक वेळा या स्थितीमध्ये बदल होतो. दोन्ही पाय दुमडतात किंवा मागील पाय प्रथम बाहेर येतात.
३) अनेक वेळा डोके मागे वळलेले असते. काही वेळा फक्त वासराचे शेपूट बाहेर दिसते. वासरात जर विकृती असेल अनैसर्गिक वाढ झाली असेल तरीदेखील वासरू बाहेर पडण्यास अडथळा निर्माण होतो.
४) गर्भाशयाला पीळ असेल तरीदेखील जनावरे विताना आडतात. पहिलारू कालवड किंवा रेडी तसेच वयस्कर कुपोषित गाय किंवा म्हैस असेल तर विताना अडथळा निर्माण होतो. गाभण काळात जर काही आजारांना जनावर बळी पडले असेल तरी देखील प्रसूती कष्टमय होते.
उपाययोजना
१) अडलेल्या जनावरांना सोडविण्याकरता आपल्याला तज्ञ व्यक्तीची किंवा तज्ञ पशुवैद्यकाची वेळेत मदत झाली तर जनावरांची प्रसुती सुलभ होऊ शकते. त्यासाठी आपण ज्यावेळी आपली गाय किंवा म्हैस गाभण काळाच्या शेवटच्या टप्प्यात येते तेव्हा काळजीपूर्वक लक्ष द्यावे.
२) साधारण विण्याची तारीख गाई म्हशी समोर ठळक अक्षरात नोंदवून त्यावर कायम लक्ष ठेवावे.
३) साधारणपणे गाई म्हशी रात्री उशिरा किंवा पहाटे वितात. त्यासाठी अधून मधून रात्री उठून लक्ष देणे आवश्यक आहे.
४) जनावरे विताना त्यांना देखील प्रायव्हसी हवी असते. त्यामुळे दुरूनच लक्ष ठेवून सर्व सोपस्कार पार पाडावेत.
५) अगदीच प्रसूती अवघड होणार असेल, वेळ लागत असेल तर तज्ञ पशुवैद्यकाला बोलावून घ्यावे. ते त्यांचे ज्ञान, कौशल्य आणि अनुभव याचा वापर करून कमीत कमी जनावरांना त्रास होईल याची काळजी घेऊन प्रसूती सुलभ करतात. त्यांचा पुढील परिणाम वासरावर, गाय म्हशीवर होणार नाही किंवा दूध उत्पादनावर होणार नाही याची काळजी ते निश्चितच घेतात. त्यामुळे तज्ञ पशुवैद्यकांच्या संपर्कात राहून आपल्या गाई म्हशींची कष्ट प्रसूती सुलभ करून घ्यावी इतकच.
डॉ. व्यंकटराव घोरपडे
सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली
अधिक वाचा: गाई म्हशीचे मायांग का बाहेर पडते? कसे कराल उपाय वाचा सविस्तर