पशुपालानातील मुख्य खर्च जवळ जवळ ७०% टक्के हा चाऱ्यावर होत असतो. त्यामुळे पशुपालनातील उत्त्पन्न व पशुपालाकाची सुबत्ता ह्या गोष्टी स्वस्त व मुबलक चाऱ्याच्या व पशुखाद्याच्या पुरवठ्यावर अवलंबून आहे. कमी होत असलेल्या शेतजमिनीची उपलब्धता आणि नगदी पिकांना शेतकरी देत असलेल्या प्राधान्याने उच्च दर्जाचा चारा कमी प्रमाणात उपलब्ध होते व उत्पादन खर्च वाढतो. पर्यायी चारा पिके जे माती विना फक्त पाण्यावर, कमी जागेत, कमी वेळेत व स्वस्तात भरपूर चारा देतात अश्या हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाचा वापर करून पशुपालन फायद्याचे करता येईल.
हायड्रोपोनिक्स म्हणजे काय?“हायड्रो” म्हणजे पाणी आणि हायड्रोपोनिक्स म्हणजे फक्त पाण्याचा वापर करून माती विना वनस्पतीची वाढ करणे होय. यालाच मराठीत “जलजन्य वनस्पती” असे म्हणतात. या तंत्रज्ञानाचे सर्वश्रुत उदाहरण म्हणजे घरात बाटलीत पाणी भरून त्यात वाढवला जाणारा “मनी प्लांट” होय. ह्यात वनस्पतीच्या वाढीला लागणारे घटक पाण्यातून पुरविले जातात व मातीविना सूर्यप्रकाशाच्या मदतीने वनस्पती वाढविल्या जातात. पारंपारिक पद्धतीत बी मातीत रुजताना त्यात साठविलेली उर्जा ही सुरवातीला जास्तीत जास्त मुळाच्या वाढीसाठी वापरली जाते परंतु हायड्रोपोनिक्स मध्ये हीच उर्जा अंकुर वाढविण्यासाठी वापरली जाते त्यामुळे त्याची जोमदार व वेगवान वाढ होते.
अधिक वाचा: पशुखाद्य व वैरण मुरघासबेल, वैरणीच्या विटा आणि टीएमआर निर्मितीसाठी ५० लाख अनुदान, कसा कराल अर्ज?
हायड्रोपोनिक्स साठी लागणारे साहित्य व प्रकल्पाची उभारणीहायड्रोपोनिक्स साठी तयार प्रकल्प बाजारात उपलब्ध आहेत, परंतु स्वस्तात प्रकल्प उभारणी साठी सहज उपलब्ध होणारे खालील प्रमाणे साहित्य घेऊन प्रकल्प उभारता येईल- प्लास्टिक ट्रे: ह्याला खालच्या बाजूला छोटे छोटे छिद्रे बनवावीत ज्यातून अतिरिक्त पाणी वाहून जाईल.- ट्रे ठेवण्यासाठी लोखंडी रॅक: ह्यात पाच ते सात टप्पे करून एका वर एक असे ट्रे ठेवण्यासाठी सोय करण्यात यावी.- प्रकल्प क्षमतेनुसार पाण्याची मोटार - स्प्रिंकलरच्या प्लास्टिकच्या नळ्या व फोगर वापरून सर्वत्र सम प्रमाणात पाणी फवारले जाईल अशी सोय करावी. - टायमर मशीन वापरून दर दोन तासाने ३-६ मिनिटे मोटार चालू करून पाणी स्प्रिंकलरने फवारण्याची सोय करावी.- सावलीसाठी शेड नेट वापरवी.- एक दोन जनावरांसाठी, प्रकल्प न उभारता ट्रे जमिनीवरच ठेवून झारीने पाणी फवारले तरी उत्तम रीतीने चारा निर्मिती शक्य आहे.
हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाने चारा निर्मिती- या तंत्रज्ञानाने चारा निर्मिती करण्यासाठी मका, गहू, बार्ली किंवा ओट यांसारखे तृणधान्ये वापरून चारा निर्मिती करता येते.- धान्य १२ तास पाण्यात भिजवून, १२ ते २४ तास मोड येणेसाठी गोणपाटात गुंडाळून ठेवावे.- मोड आलेले धान्य प्लास्टिक ट्रे मध्ये पसरवून एक थर बनवावा. ट्रे साठी बनविलेल्या रॅकमध्ये ठेवावे.- त्यावर दर दोन तासाने ३-६ मिनिटे पाणी स्प्रिंकलरने फवारण्याची सोय करावी.- दहा ते बारा दिवसात अंकुर वाढून २५-३० से.मी. उंच वाढतात.- एक किलो धान्यापासून आठ ते दहा किलो हिरवा, सकस व ताजा चारा तयार होतो.- हे वाढलेले अंकुर दहा किलोपर्यंत एका मोठ्या जनावराला रोज खाऊ घालता येतात.- यात फुटलेले दाणे वापरू नये, त्यास बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो.- ज्वारीचा वापर करू नये कारण ज्वारीच्या कवळ्या अंकुरात हायड्रो सायनिक अॅसिड असते जे जनावरांना अपायकारक असते.
हायड्रोपोनिक्स चाऱ्याचे महत्व- वर्षभर सुरळीत व मुबलक हिरव्या व सकस चाऱ्याची निर्मिती.- ह्यातून प्रथिने, अमिनो अॅसिडस्, जीवनसत्वे व क्षार खनिजे मोठ्या प्रमाणावर मिळतात.- हा चारा वर्षभर सारख्याच गुणवत्तेचा, चवीचा व ताजा असतो.- जनावरे हा चारा आवडीने खातात.- ह्यामुळे जनावरांचे आरोग्य, दुग्धोत्पादन, प्रजनन व जीवनमान सुधारते.- यात कमी मजुरीत व कमी जागेत जास्त चारा निर्मिती करता येते.- रोज हवे तितकेच उत्पादन झालेने साठवणूक व वाहतुकीचा खर्च वाचतो.- हा चारा मुळासकट खाऊ घातलेने यातील कुठलाही भाग वाया जात नाही.
डॉ. सचिन दगडूराम रहाणेपशुधन विकास अधिकारी (गट अ) पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १, डिंगोरे, ता. जुन्नर, जि. पुणे