दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाय दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने ५ जानेवारी २०२४ रोजी घेतला आहे. मात्र यात पशुधनास टॅगिंग व ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. दूध उत्पादकांनी पशुधनास कानात टॅगिंग करून घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
दूध व दुग्धजन्य पदार्थाचे भाव हे प्रामुख्याने मागणी व पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दूध भुकटी व बटरचे दर यावर अवलंबून असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटी व बटरचे दर कमी झाल्यास दुधाचे दर कमी होतात. राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना निश्चित केलेल्या दूध दरानुसार भाव मिळत नसल्याने दूध उत्पादक अडचणीत येत होते. त्यामुळे वेगवेगळ्या दुधाच्या गुणप्रतीत एकसूत्रता यावी, यासाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर दुधाची गुणप्रत निश्चित केली आहे. तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला उचित भाव मिळावा यासाठी अनुदान योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
यासंदर्भात पशुधनास टॅगिंग व भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी करण्यासाठी अभियान राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क करून पशुधनाची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी केले आहे.
पशुधनास टॅगिंग व नोंदणीस शेतकरी, पशुपालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत पशुधन नोंदणी ३१७५, पशुपालक नोंदणी ९२३, पशुपालक हस्तांतरण नोंदणी ३००, पशुधनाच्या नोंदीत बदल ३२८, कानातील टॅग बदल नोंदी ७३, पशुपालकांच्या नावातील बदल १४ याप्रमाणे अतिरिक्त नोंदणी करण्यात आल्या आहेत. तसेच अतिरिक्त्त ८७ हजार २०० टॅग नव्याने उपलब्ध करून देण्यात आलेआहेत.
असे मिळणार अनुदान
सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांमार्फत संकलित होणाऱ्या गाय दुधासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर ५ रुपये अनुदान मिळेल. सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पामार्फत दूध उत्पादक शेतकऱ्यांना ३.५ फॅट / ८.५ एसएनएफ या गुणप्रतिकरिता किमान २७ रुपये प्रतिलिटर इतका दर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावे लागणार आहेत. त्यानंतर शासनामार्फत ५ रुपये प्रतिलिटर बँक खात्यावर रक्कम जमा होणार आहे. दरम्यान, ही योजना ११ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२४ या कालावधीसाठी राबविण्यात येणार आहे.
पशुधनास टॅगिंग व नोंदणी प्रक्रिया
पशुधनास टॅगिंग करणे व भारत पशुधन प्रणालीमध्ये नोंदणी करणे अत्यावशक आहे. त्यानुषंगाने सर्व पशुवैद्यकीय संस्थांमार्फत पशुधनास टॅगिंग व भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी प्रक्रिया सुरू आहे.