शेळीपालन हाशेतीपूरकव्यवसाय असून कमी भांडवल व कमी जागेत हा व्यवसाय करता येण्यासारखा आहे. शेळ्यांना इतर जनवरांपेक्षा जसे की गाई, म्हैस यांपेक्षा खूप कमी प्रमाणात खाद्य लागते. साधारणत: एका गाईला लागणाऱ्या खाद्यामध्ये १० शेळ्या जगू शकतात. त्यामुळे अल्प भूधारकांसाठी हा व्यवसाय अतिशय फायदेशीर आहे.
खाद्याचे, शेळ्यांच्या आरोग्याचे, निवाऱ्याचे व पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास हा व्यवसाय अतिशय फायदेशीर ठरतो. बंदिस्त तसेच अर्ध बंदिस्त या प्रकारे हा व्यवसाय केला जातो. शेळीपालन व्यवसाय सुरु करत असताना गुणवत्तापूर्ण शेळ्या खरेदी करणे महत्वाचे आहे. यात शेळीची निवड करताना त्याचा अभ्यास करणे महत्वाचे आहे. शेळी व मेंढीची निवड करताना पुढील काळजी घ्यावी.
शेळीची निवड
उत्तम उत्पादनक्षमता असलेला कळप तयार करण्यासाठी शेळ्यांच्या निवडीकडे लक्ष देणे आवश्यक असते.
१) शेळीच्या नाकपुड्या मोठ्या असाव्यात. डोळे पाणीदार असावेत.
२) शेळी वयाप्रमाणे पूर्ण वाढ झालेली असावी. शक्यतो एक वेत झालेली शेळी विकत घ्यावी.
३) एका वर्षात शेळीचे वजन ३० किलोपेक्षा कमी नसावे.
४) कास मोठी व मऊ असावी. सड सारख्या लांबीचे असावेत. सड सुके नसावेत.
५) खांद्यापासून पुठ्यापर्यंतचा भाग सरळ असावा.
६) छाती भरदार, पोट मोठे व डेरेदार असावे. केस व त्वचा तुकतुकीत असावी.
७) शेळीचे चारही पाय मजबूत व सरळ असावेत.
८) शेळी नियमित प्रमाणे माजावर येणारी व न उलटणारी असावी.
९) शेळी जुळे करडे देणारी असावी.
१०) शेळी आकाराने मोठी असावी. तिची मान लांब असावी. तोंडापासून शेपटीपर्यंत असणारा लांबपणा हेही महत्वाचे लक्षण आहे.
मेंढीची निवड
१) पैदाशीसाठीची मेंढी आकाराने मोठी असावी. पाय सरळ, पिळदार व खूर (टाचा) उंच असावेत.
२) दुभत्या मेंढीची धार काढून पाहावी. दुधाचे प्रमाण, दुधाचा रंग, कासेवर सूज या गोष्टी पारखून घ्याव्यात.
३) मेंढी विकत घेताना तिची कास नीट पारखून घ्यावी.
४) दुभती मेंढी निवडताना तिचे वय, कोकरांची संख्या, दुधाचे प्रमाण इत्यादी गोष्टींकडे लक्ष द्यावे.
५) दुभती मेंढी लठ्ठ व मंद नसावी, ती टवटवीत व चपळ असावी. मेंढीचे सर्व दात बळकट व सुस्थितीत असावेत.
६) शक्यतो एक ते दोन वर्षे वयाची (दोन ते चार दाती) मेंढी विकत घ्यावी.
७) केस मऊ व चमकदार दिसणारे असावेत.
८) भरदार छाती असावी. बांधा मोठा असावा, जेणेकरून दोन किंवा अधिक कोकरांना मेंढी आपल्या गर्भाशयात जोपासू शकेल.