Join us

गाई-म्हशी खरेदी करताना होणारी फसवणूक टाळण्यासाठी महत्वाच्या टिप्स; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 16:34 IST

घरच्या घरीच जन्माला आलेले पशुधन हे सांभाळणे चांगलेच. पण जर आपल्याला वर उल्लेख केलेल्या कारणांसाठी पशुधन खरेदी करावे लागले तर अशावेळी आपल्याला अनेक बाबी लक्षात ठेवायला हव्यात.

गाई-म्हशी खरेदी करताना घ्यावयाची काळजी अनेक वेळा आपण वेगवेगळ्या कारणासाठी गाई-म्हशी खरेदी करत असतो. घरी दूध उपलब्ध व्हावे, दुग्ध व्यवसायासाठी, अनेकदा शासकीय योजना मंजूर झाल्यामुळे आपल्याला पशुधन खरेदी करावी लागते.

शक्यतो घरच्या घरीच जन्माला आलेले पशुधन हे सांभाळणे चांगलेच. पण जर आपल्याला वर उल्लेख केलेल्या कारणांसाठी पशुधन खरेदी करावे लागले तर अशावेळी आपल्याला अनेक बाबी लक्षात ठेवायला हव्यात.

गाय-म्हैस खरेदी करण्यापूर्वी करावयाचा अभ्यास१) गाय-म्हैस खरेदी करताना ते आपल्याच भागातील आपल्या हवामानात वाढलेले असावे.२) चांगल्या जनावराची पारख करून ते खरेदी करावे.३) बाजारातच खरेदी करायचे असेल तर दोन-तीन बाजारात फक्त फिरून यावे. दराचा अभ्यास करावा.४) कोणत्या भागातून जनावरे विक्रीसाठी येतात हे पहावे. मगच खरेदीसाठी बाजारात जावे.५) खरेदीपूर्वी आपल्याकडे वर्षभर हिरवा चारा उपलब्ध होऊ शकतो का?६) आपण हिरव्या चाऱ्यासाठी किती क्षेत्र उपलब्ध करून देऊ शकतो.याचा विचार जरूर करावा त्याचप्रमाणे गाय किंवा म्हैस याची निवड करावी.

गाय व म्हैस खरेदी करताना घ्यावयाची काळजी१) जनावर खरेदी करताना खरेदी करत असलेल्या गाई म्हशी म्हशीमध्ये त्यांच्यी जाती वैशिष्ट्ये आहेत का तपासून पहावे.२) शिंगाची ठेवण, डोळे, कासेची ठेवण, कातडीची जाडी, पायाची ठेवण वगैरे तपासून घ्यावे.३) बाजारात खरेदी करताना त्याचे दूध उत्पादन व वंशावळ याबाबतीत काहीच माहिती उपलब्ध नसते. अनेक वेळा याबाबत खोटी माहिती समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्यावेळी इतर गोठ्यात, पशुपालकांच्या दारात गाई-म्हशी खरेदी करतो त्यावेळी प्रत्यक्ष दूध काढून दूध उत्पादनाची खात्री करता येते.४) गाय-म्हैस धार काढू देते का? धारेला जड आहे का? सर्व सडातून दूध येते का? दुधाच्या चिळा सरळ भांड्यात पडतात का? हे तपासून योग्य किंमत निश्चित करता येते. या सर्व कारणासाठी व्यालेले जनावर खरेदी करणे योग्य ठरेल.५) अनेक वेळा गाभण जनावर आपल्या गोठ्यात आल्यानंतर प्रसूतीदरम्यान अडथळा निर्माण होऊ शकतो. मायांग बाहेर पडू शकते. वाहतूक करताना अडचणी निर्माण होऊ शकतात.६) दूध उत्पादनाचा अंदाज येत नाही म्हणून नेहमी दुसऱ्या वेताचे व्यालेले जनावर निवडावे.७) पुढे चौथ्या पाचव्या वेतापर्यंत दूध वाढत जाते व नंतर त्यामध्ये घट व्हायला सुरुवात होते ही बाब पशुपालकांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.

दुधाळ जनावरांची निवड कशी करावी?१) दुधाळ जनावर दिसायला तरुण व आकर्षक असावे.२) त्वचा तरतरीत, निरोगी, पातळ व लवचिक असावी.३) अवयवाची ठेवण प्रमाणाबद्ध असावी.४) जनावर खरेदीपूर्वी चालवून पहावे. त्यामुळे चालण्यातील दोष कळतात. कासेची ठेवण पाहता येते.५) कासेची त्वचा मऊ व रक्तवाहिन्यायुक्त असाव्यात.६) सड समान अंतरावर व समान लांबीचे असावेत.७) कान स्वच्छ असावेत. फुटलेले असू नयेत.८) शिंगाच्या बेचक्यात जखम आहे का हे तपासून पहावे.९) नाकपुड्या देखील रुंद असाव्यात.१०) एकूण जनावर खरेदी करताना पशुवैद्यकांची मदत घ्यावीच पण एखादा चाणाक्ष मित्र देखील सोबत असावा.

जाता जाता.. ज्यावेळी आपण शासकीय योजनेअंतर्गत जनावरे खरेदी करत असतो त्यावेळी त्यासाठी असणारे नियम व अटी याचे पालन करावे.

डॉ. व्यंकटराव घोरपडेसेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली

अधिक वाचा: तुम्हालाही पशुप्रदर्शनात मारायची असेल बाजी; पशुपालकांनो अशी करा तयारी

टॅग्स :दुग्धव्यवसायगायदूधव्यवसायशेतकरीआरोग्यसरकारी योजना