कोल्हापूर : जिल्ह्यात बुधवारी पुराच्या पाण्याने अनेक गावांना वेढा दिल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. प्रमुख मार्गावर पाणी आल्याने दुधासह भाजीपाल्याच्या आवकेवर परिणाम झाला आहे. बुधवारी सकाळचे व सायंकाळचे असे पंधरा हजार लिटर दूध घरात राहिले आहे.
कोल्हापूर बाजार समितीच्या भाजी मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक घटली आहे; पण अद्याप त्याचा दरावर परिणाम झालेला नाही. गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस कोसळत असल्याने विसर्ग वाढल्याने नद्यांची फुग वाढली आहे.
गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, चंदगड या भागातील बहुतांशी मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प आहे. पर्यायी मार्गही बुधवारी हळूहळू बंद होऊ लागल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.
'गोकुळ', 'वारणा' सह इतर छोट्या-छोट्या दूध संघांच्या संकलनावर परिणाम झाला आहे. 'गोकुळ'चे बल्क कुलर काही ठिकाणी असल्याने सुरूवातीला दोन दिवस फारसा परिणाम झाला नाही. पण आता बल्क कुलरही फुल्ल झाल्याने गोची होऊ लागली आहे.
इतर दूध संघांचीही तीच अवस्था आहे. दिवसभरात सुमारे पंधरा हजार लिटर दूध घरात राहिले आहे. पावसाचा वेग पाहता, पुराचे पाणी आणखी वाढणार असून, त्यानंतर दूध उत्पादकांना आणखी फटका बसणार आहे.
सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांत पुराच्या पाण्याचा तडाखा भाजी उत्पादकांना बसला आहे. कोल्हापूर बाजार समितीत कांदा, बटाटा व भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे.