राज्यात लम्पी त्वचारोगाचा धोका पुन्हा एकदा वाढल्याचे चित्र असून सुमारे सहा हजार जनावरांना या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.
मागील वर्षी लसीकरणामुळे काहीसा कमी झालेल्या लंपी त्वचारोगाने पुन्हा डोके वर काढले असून आता पुन्हा एकदा या रोगाचा वेगाने संसर्ग सुरू आहे. सध्या या रोगाची तीव्रता कमी असून जीवित हानीचा धोका कमी असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात येत असल्याचे वृत्त आहे.
नगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, नांदेड,हिंगोली जिल्ह्यात गोवंश जनावरांमध्ये लम्पी त्वचारोगाचा संसर्ग वाढला असून सर्वाधिक रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. त्यामुळे लवकरात लवकर लम्पी त्वचारोग प्रतिबंधक लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
लंपी रोगाचा प्रसार कसा होतो?
लंपी त्वचारोग हा विषाणूजन्य रोग असून तो गोवंशामध्ये प्रामुख्याने आढळून येतो. सर्व वयोगटातील जनावरे आणि नर व मादी दोघांनाही हा रोग होऊ शकतो. डास, चावणाऱ्या माशा, गोचीड, चिलटे, बाधित जनावराचा स्पर्श, दूषित चारापाणी यामुळे या रोगाचा संसर्ग वाढू शकतो.
शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?
• चारा कमी खाणाऱ्या जनावराचा तात्काळ ताप मोजावा व नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याचे संपर्क साधून उपचार करून घ्यावा.• बाधित जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवणे• कोणत्याही संभाव्य रोगी जनावरास निरोगी जनावराच्या कळपात प्रवेश करण्यास बंदी करणे.• रोग प्रादुर्भाव झालेला गावातील बाधित जनावरांना चराऊ कुरणांमध्ये एकत्रित सोडण्यास मनाई करणे• डास, माश्या, गोचीड व तत्सम कीटकांचा पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार औषध वापरून बंदोबस्त करणे.• आजाराची लक्षणे आढळल्यास जनावरांचे लसीकरण करून घेणे
काय आहेत लक्षणे?
• अंगावर दहा ते वीस मिमी व्यासाच्या गाठी• जनावरास सुरुवातीला भरपूर ताप• डोळ्यातून, नाकातून चिकट स्त्राव• चारापाणी खाणे कमी किंवा बंद होणे• दूध उत्पादन कमी• काही जनावरांना पायावर सूज येणे व लंगडणे