गायी/म्हशी नियमितपणे व्याल्यासच ती फायदेशीर उरते. गाय वेळेत माजावर न येणे, दोन वेतातील गर्भधारणेचा कालावधी अधिक असणे, गायी/म्हशी वारंवार उलटणे, ह्या समस्यामुळे, जनावरामध्ये वांझपणा येतो व शेतकरी आर्थिक अडचणीत येतो.
वांझपणाचे प्रकार
१) कायमचा वांझपणा
कारणे: अनुवंशिक गुण, गर्भाशयाची अपुरी वाढ, स्त्रीबीजांडाची वाढ न होणे, स्त्रीबीजात दोष, एकाच वेळी दोन भिन्न लिंगाची जुळी वासरे होणे.
२) तात्पुरता वांझपणा: तात्पुरता वांझपणा निदानानंतर योग्य उपचाराने बरा होतो.
अ) मुका माज दाखविणे
याकरीता शेतकऱ्याला गायी/म्हशीतील माज ओळखता आला पाहिजे. म्हणजे गायी/म्हशीतील कृत्रीम रेतनाची योग्य वेळ कळू शकेल.
शेतकऱ्याने आपल्या जनावरांच्या खालीलप्रमाणे नोंदी ठेवणे आवश्यक आहे.
१) जनावर माजावर आलेली तारीख
२) माज किती दिवस टिकला
३) कृत्रिम रेतनाची तारीख
४) जनावर उलटलेले असेल तर जनावराची पूर्वी माजावर आल्याची तारीख
जनावरातील माज कसा ओळखावा?
माजावर येणारी गाय शेपटी उडवते, अस्थिर असते व वारंवार लघवी करते. योनी लालसर व सुजलेली दिसते. योनीमार्गे विकट द्रव (सोट) पाझरतो. (अंड्याच्या पांढऱ्या बलकासारखा) दुसऱ्या गायीवर उडते. दुसऱ्या जनावरासोबत लगट करते. मुका माज दाखविणारे जनावर माजावर येऊन गेले तरी समजत नाही. जनावर माजावर येऊन गेल्यानंतर मांडीवर/योनीच्या खालच्या बाजूस स्त्रावाचे पापुद्रे आढळतात.
ब) सांसर्गिक लैंगिक रोगामुळे
लाळखुरकत, ब्रुसोल्लोसीस (सांसर्गिक गर्भपात) रोगामुळे वांझपणा येतो.
क) व्याल्यानंतर न घेतलेली काळजी
गाय/म्हशी व्यालानंतर तिचे गर्भाशय पूर्वस्थितीत येईपर्यंत काळजी न घेतल्यास जंतू संसर्ग होतो व गाईला/म्हशीला गर्भाशयाचे विकार जडतात.
ड) आहारातील दोष
अधिक दूध उत्पादनाच्या दृष्टीने मायीस अधिक आहार दिला जातो. त्याचे परिणाम गाय लठ्ठ होऊन गायीची प्रजनन क्षमता कमी होते. गायीच्या आहारातील अ,ब,क,ड,ई या जिवनसत्वाचा व तांबे लोह व कॅल्शियम या धाराच्या अभावामुळे/कमतरतेमुळे गायीमध्ये वांझपणा येतो.
उपाययोजना
वंध्यत्व निवारण शिबीरामध्ये आपल्या गायी/म्हशी पशुवैद्यकाकडून तपासून घ्या. वंध्यत्व निवारण शिबीरामध्ये पशुवैद्यक जनावरांची लैंगिक तपासणी करतात व पशुपालकास तपासणीअंती निष्कर्ष, योग्य उपाय व औषधोपचाराबाबत मार्गदर्शन करतात.
१) वयात येण्यास उशीर झालेल्या जनावरांबाबत मार्गदर्शन व योग्य औषधोपचार.
२) जनावर अंदाजे कधी माजावर येईल व माज ओळखण्याच्या कृत्रिम रेतनाची योग्य वेळ कळू शकते.
३) सकाळी माज दाखवणान्या जनावराला, संध्याकाळी कृत्रिम रेतन व संध्याकाळी माज दाखवणा-या जनावराला सकाळी कृत्रिम रेतन करावे.
जनावरांची घ्यावयाची काळजी
गायी/म्हर्शीची लैंगिक तपासणी दर महिन्यात नियमित करुन घ्यावी.
रोगप्रतिबंधक लसीकरण करावे गोचिड प्रतिबंधक उपाय व गोठ्याची स्वच्छता राखावी जनावरांच्या आहारासंबंधी पशुवैद्यकाकडून मार्गदर्शन घ्यावी.
१) मोड आलेली कडधान्ये व ३० ते ६० ग्रॅम खनिज मिश्रण स्वरूपात द्यावे.
२) चाटण वीट गव्हाणीत गुरांपुढे टांगून ठेवावी
३) ३० ग्रॅम (मुठभर) जिवनसत्वयुक्त क्षारमिश्रण प्रत्येक जनावरास दररोज द्या.
कधी जनावर तपासताना त्याच्या शेणाच्या पिशवीतून रक्तस्त्राव झाला तर घाबरून जाण्याचे कारण नाही, तपासणीनंतर तो आपोआप थांबतो व गायी/म्हशीतील प्रजनन संस्थेस काहीही अपाय होत नाही. तर शेतकरी बंधुनो, आपल्या गायी/म्हशी न चुकता वंध्यत्व तपासणी करीता शिबीरात किंवा नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात न्या.
पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपुर