भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत असतानाच जत तालुक्यातील मेंढपाळ व्यवसायाला गर्भधारणा न होण्याचा फटका बसला आहे. ओल्या चाऱ्याच्या अभावामुळे कुपोषित मेंढ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
गर्भधारणा न झाल्यामुळे मेंढ्यांचे उत्पादन थांबले आहे. मेंढीपालन व्यवसाय आर्थिक संकटात सापडला आहे. नैसर्गिक संकटामुळे मेंढीपालन व्यवसायाचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे. जत तालुक्यामध्ये शेळ्या-मेंढ्यांची संख्या १ लाख ९५ हजार ४३८ इतकी आहे. त्यापैकी मेंढ्यांची संख्या १ लाख इतकी आहे.
माडग्याळ जातीची मेंढी प्रसिद्ध आहे. उत्पन्नही चांगले मिळत असल्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय केला जातो. माडग्याळ येथील आठवडा बाजार शेळ्या-मेंढ्यासाठी प्रसिद्ध आहे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल या बाजारात होते.
माडग्याळ जातीच्या काळ्या व पांढुरक्या पट्ट्याच्या मेंढ्या पाळल्या जातात. ही मेंढी जास्त काटक, वजनाला चांगली, चवदार मांस मिळत असल्यामुळे मागणी मोठी आहे. एका मेंढीपासून वर्षाला ७ ते ८ हजारांचे उत्पन्न मिळते.
तालुक्यातील पांढरेवाडी, कुलाळवाडी, सिद्धनाथ, दरिबडची, लकडेवाडी, मोटेवाडी, भिवर्गी, जालिहाळ खुर्द, तिल्याळ, करजगी, बोर्गी आदी भागात मेंढ्यांची संख्या अधिक आहे.
१०० ते १५० मेंढ्यांची खांडे आहेत. मेंढ्याचे प्रमुख खाद्य झाडपाला, बाभळीच्या शेंगा, ओले गवत आहे. पावसाअभावी बाभळीची झाडे, गवत वाळून गेले आहे. सकस आहारासाठी जनावरे कुपोषित झाली आहेत. गर्भाची वाढ व्यवस्थित होत नाही.
वाढती उष्णता, सकस आहाराचा अभाव, दूषित पाण्यामुळे गर्भपात व गर्भधारणा न होण्याच्या प्रमाणात २० ते ३० टक्के एवढे आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये मेंढ्या हिमतीने जगविल्या आहेत. गर्भपात झाल्यामुळे पूर्ण खांडे मोकळी झाली आहेत. यापूर्वी पहिल्यांदाचा मोठा फटका बसला आहे, असे मेंढपाळ सिदराया करपे यांनी सांगितले.
विविध कारणाने गर्भधारणेवर परिणाम वाढत्या उष्णतेमुळे गर्भधारणा होऊ शकत नाही. सकस आहाराच्या अभावामुळे थेट परिणाम होतो. प्रतिकूल परिस्थितीमुळे गर्भधारणा होऊ शकत नाही. मेंढ्या कुपोषित झाल्यामुळे गर्भधारणा होत नाही. - डॉ. कुणाल कांबळे तालुका पशुधन विकास अधिकारी
तातडीच्या उपायांची गरज
• हत्तीगवत, लसूण गवत, पांगारी, बाभळीच्या झाडांची व गवताची लागण करणे.
• ओल्या चाऱ्याचा पुरवठा करणे.