३८-३९ रुपयांवर गेलेला खरेदी दर २६-२७ रुपयांवर आल्याने प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला खरा; मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यासाठी काही दूध संस्थांनी अनास्था दाखवली आहे.
असे असले तरी राज्यात प्रथमच २ लाख ८९ हजार ४४६ शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट अनुदान जमा झाले आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट अनुभव जमा करण्यास आढेवेढे घेणाऱ्या दूध संस्था पशुसंवर्धन खात्याचे सचिव तुकाराम मुंडे यांच्या दट्टयामुळे राजी झाल्याने थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचे सांगण्यात आले.
मागील वर्षी गाय दूध खरेदी दर प्रतिलिटर ३९ रुपयांवर गेला होता. असे चार पैसे मिळू लागले असतानाच दरात घसरण सुरू झाली. ३९ रुपये असलेला दर महिनाभरात २६ रुपयांवर आला. ऐन उन्हाळ्यात दरात वाढ होण्याऐवजी घट झाल्यानंतर दूध उत्पादकांमध्ये राग व्यक्त होऊ लागला.
२६-२७ रुपये दर शेतकऱ्यांना परवडेना झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्यानंतर राज्य शासनाने दोन महिन्यांसाठी प्रतिलिटर ५ रुपये अनुदान जाहीर केले. हे अनुदान थेट दूध उत्पादकांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अनुदानास पात्र ठरण्यासाठी गाईचे टॅगिंग करणे बंधनकारक करण्यात आले. टॅगिंग असलेल्या गाईचे दूध अनुदानास पात्र ठरविण्यात येत आहे. पशुधनाचे टॅगिंग करणे व यातील माहितीच्या आधारे अनुदानासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचा निकष महत्त्वाचा होता.
सुरुवातीला गाईचे टॅगिंग करण्यासाठी दूध संस्था ना-ना करीत होत्या; मात्र पशुसंवर्धन खात्याचे सचिव तुकाराम मुंडे यांच्या दट्टयामुळे हळूहळू एक-एक संस्थांनी अनुदानासाठी आवश्यक ती माहिती भरली. व्यवस्थित माहिती आल्याने दूध उत्पादकांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत.
पात्र संस्था - २३७
युनिक आयडी शेतकरी - २,८९,४४६
युनिक आयडी गायी - १०,१९,८९१
अनुदान पात्र दूध - ४३ कोटी ३० लाख लिटर
वितरित अनुदान - २१६ कोटी ५० लाख रुपये
थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्यासाठी सचिव तुकाराम मुंडे यांनी स्वॉप्टवेअर प्रथमच डेव्हलप केले. पशुसंवर्धन खात्याने टॅगिंगचे काम वेगात केले. भविष्यात शेतकऱ्यांसाठी शासकीय योजना राबविण्यासाठी याचा उपयोग होईल. पारदर्शकपणे थेट शेतकऱ्यांना दुधाचे अनुदान पहिल्यांदाच मिळाले आहे. - प्रशांत मोहोड, आयुक्त, दुग्धविकास
अधिक वाचा: मराठवाडा, विदर्भात दहा हजार गायी-म्हशी देणार