Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > जागतिक महिला दिन विशेष; महिला पशुवैद्यकांची भरारी आणि अपेक्षा

जागतिक महिला दिन विशेष; महिला पशुवैद्यकांची भरारी आणि अपेक्षा

International Women's Day Special; Role and Expectations of Women Veterinarians | जागतिक महिला दिन विशेष; महिला पशुवैद्यकांची भरारी आणि अपेक्षा

जागतिक महिला दिन विशेष; महिला पशुवैद्यकांची भरारी आणि अपेक्षा

अनेक महिला मग पुढे पदव्युत्तर शिक्षण घेतात. आचार्य, (PhD) आचार्योत्तर (Post Doc) शिक्षण घेतात. अनेक महिला उच्च शिक्षणासाठी परदेशात देखील जातात. सध्या त्यांना खुणावणारे मोठे क्षेत्र म्हणजे श्वान, मांजर व पाळीव पक्ष्यांचे दवाखाने.

अनेक महिला मग पुढे पदव्युत्तर शिक्षण घेतात. आचार्य, (PhD) आचार्योत्तर (Post Doc) शिक्षण घेतात. अनेक महिला उच्च शिक्षणासाठी परदेशात देखील जातात. सध्या त्यांना खुणावणारे मोठे क्षेत्र म्हणजे श्वान, मांजर व पाळीव पक्ष्यांचे दवाखाने.

शेअर :

Join us
Join usNext

१९८० च्या दशकात हातावर मोजण्या इतपत असणाऱ्या राज्यातील महिला पशुवैद्यकांची संख्या विचारात घेतली तर आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान दहा ते अकरा महिला पशुवैद्य पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक येथे काम करताना दिसतात.

एक काळ असा होता की अगदी शेवटचा पर्याय म्हणून पशुवैद्यक क्षेत्राकडे पाहिले जात होते. पण जसा काळ बदलत गेला एकूणच देशातील राज्यातील श्वेतक्रांती, वाढता दुग्ध व्यवसाय, अनुषंगिक त्यावर आधारित इतर व्यवसाय वाढत गेले. शेळीपालनासह मेंढी पालन, वराह पालन, कुक्कुटपालन यामध्ये अमुलाग्र बदल होत गेले. त्यामध्ये आता व्यवसायिकता वाढीस लागली आहे.

सोबत मग पशुरोग निदान, औषध निर्माण, लस निर्मिती, पशुखाद्य निर्मितीसह संबंधित विश्लेषक प्रयोगशाळा, पशुधन विमा त्यासाठी काम करणाऱ्या कंपन्या, शासकीय योजना व व्यवसायिक पशुसंवर्धनातील बँकांचा वाढता सहभाग त्यामुळे अशा अनेक विभागात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत गेल्या त्यामुळे अनेक विद्यार्थी या क्षेत्राकडे आकर्षित होत गेले. त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचाही सहभाग वाढत गेला.

८० च्या दशकात कॉलेजच्या वर्गात दोन-चार मुली दिसायच्या आज जवळजवळ ३० टक्के जागा मुलींच्या साठी पशुवैद्यकीय महाविद्यालयात राखीव असल्याने त्यांची संख्या ३० टक्क्यापर्यंत गेली आहे. मोठ्या प्रमाणात शहरी भागासह ग्रामीण भागातील मुली देखील या सर्व राज्यातील पशुवैद्यकीय महाविद्यालयातून आज प्रवेश घेतात. साडेपाच वर्षाचा कालावधी पूर्ण करून बाहेर पडतात आणि मग वेगवेगळ्या क्षेत्रात आवडीप्रमाणे, गरजेनुसार आपापले क्षेत्र निवडतात.

अनेक महिला मग पुढे पदव्युत्तर शिक्षण घेतात. आचार्य, (PhD) आचार्योत्तर (Post Doc) शिक्षण घेतात. अनेक महिला उच्च शिक्षणासाठी परदेशात देखील जातात. सध्या त्यांना खुणावणारे मोठे क्षेत्र म्हणजे श्वान, मांजर व पाळीव पक्ष्यांचे दवाखाने. त्यामध्ये देखील अनेक महिला सुपर स्पेशलायझेशन करून मोठमोठ्या शहरात स्वतःच्या दवाखान्यात चांगले काम करत आहेत.

खरंतर पशुवैद्यक विभाग पूर्वीपासूनच पुरुषप्रधान होता. पण अलीकडे जगातील सर्व देशात महिलांनी या क्षेत्रात प्रवेश वाढवल्यामुळे जर्मनी, फ्रान्स, स्वित्झर्लंड, युके यासह युगोस्लाव्हिया, व चेकोस्लोव्हाकिया अशा देशातून मोठ्या प्रमाणात महिला पशुवैद्यकांची संख्या वाढत गेली. जगातील पहिल्या महिला पशुवैद्य म्हणून पोलिश पशुवैद्यक स्टेफनिया क्रुझेव्हस्का यांचे नाव घेतले जाते.

ज्यांनी १८८९ मध्ये पशुवैद्यक क्षेत्रातील पदवी संपादित केली. आपल्या देशाचा विचार केला तर १९५२ मध्ये पशुवैद्य क्षेत्रात पदवी प्राप्त करणाऱ्या मद्रास येथील महिला पशुवैद्य डॉ. सक्कुबाई रामचंद्रन यांचे नाव घेतले जाते. नंतर मग डॉ. प्रगती पांडा या ओरिसाच्या, डॉ. अमृता पटेल या मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी  पण गुजरातच्या पहिल्या पशुवैद्यक ठरल्या. पुढे त्यांनी एनडीडीबीच्या अध्यक्ष म्हणून देखील काम पाहिले.

डॉ. अंजली भास्करन यादेखील केरळमधील पहिल्या महिला पशुवैद्यक आहेत. तर अशा अनेक महिलांनी योगदान दिल्यानंतर आजच्या घडीला या क्षेत्रात अनेक महिला आपल्याला दिसतात. देशातील सर्व राज्यस्तरीय पशुवैद्यक परिषदांचा (State Veterinary Council) आढावा घेतला तर जवळजवळ तीन हजार ते साडेतीन हजार महिला पशुवैद्यकांनी नोंदणी केल्याचे दिसून येते.

या सर्व महिला पशुवैद्यकांनी २ ऑक्टोंबर १९८५ मध्ये स्वतंत्र असे देश पातळीवर संघटन उभा करून 'इंडियन असोसिएशन फॉर लेडी  व्हेटरनरीयन' या नावाने त्रिचूर (केरळ) या ठिकाणी संस्था देखील स्थापन केली आहे. त्या माध्यमातून नवनवीन तंत्रज्ञान महिला पशुवैद्यकांसमोर पोहोचवण्यासाठी व त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घेतला जातो. त्याचबरोबर एकमेकांचे अनुभव, ज्ञान एकमेकांना शेअर करण्याची साठी ते सभा संमेलनातून एकत्र येत असतात.

राज्यात देखील अनेक महिला निरनिराळ्या पशुवैद्यकीय क्षेत्रात जबाबदारीने काम करत आहेत. कॉलेजमधील ज्ञानदानापासून अनेक ठिकाणी शास्त्रज्ञ म्हणून, उद्योजक म्हणून देखील त्यांचे योगदान राहिले आहे. सध्या मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता म्हणून एक महिलाच काम पहात आहेत. तथापि राज्यातील एकूणच महिला पशुवैद्यकांना क्षेत्रीय स्तरावर काम करत असताना काही समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

या क्षेत्रात महिला काम करू शकतील का? अशी एक जी शंका उपस्थित केली जाते त्याला त्यांचा आक्षेप आहे. अनेक वेळा समाज या महिला पशुवैद्यकांना पशुवैद्यकीय क्षेत्रातील मेहनतीचे काम करण्यासाठी भावनिक व शारीरिक दृष्ट्या अयोग्य मानतात. पण अनेमहिला पशुवैद्यकांनी राज्यात स्वतःच्या कामाने ते चुकीचे असल्याचे सिद्ध केले आहे. त्या करतात आणि करू शकतात हे  कामकाजाच्या आकडेवारी वरून दिसून येते.

काही महिला अधिकारी आपल्या स्त्री पणाचा फायदा घेत असतीलही पण एकूणच अनेक महिला या पुरुष अधिकाऱ्यांच्या बरोबरीने काम करताना दिसतात. पशुपालकांनी देखील महिला पशुवैद्यकांचा आदर ठेवून त्यांना नियमित प्रोत्साहन द्यावे व सेवेचा लाभ वेळेत घेतल्यास त्यांना चांगल्या प्रकारची सेवा निश्चित देता येईल. शेवटी महिलांचे कुटुंबातील स्थान आपण जाणतो. कुटुंब आणि नोकरी याचा ताळमेळ साधताना काही गोष्टींची त्यांनी अपेक्षा केली आहे.

मिळणाऱ्या रजांची संख्या, दिवस वाढवून  त्याला वेळेत मंजुरी दिली जावी. अधिनस्त कर्मचारी विशेषतः जिल्हा परिषद स्तरावर अनेक वेळा जे इतर विभागांनी नाकारलेले असतात असे व्यसनी, वयस्कर कर्मचारी दिले जातात त्याऐवजी दवाखान्यातील कामकाजाचा विचार करून तशा पद्धतीचे कर्मचारी दिले जावेत.

ज्या दवाखान्यात नेमणूक केली जाते त्या ठिकाणी स्वतंत्र इमारतीसह स्वच्छतागृहाची सोय असावी. त्यांना वेगवेगळ्या मीटिंग, सभेसाठी ज्यावेळी बोलवले जाते अशावेळी सभा मीटिंग वेळेत संपवून त्यांना घरी जाऊ द्यावे. पती-पत्नी एकत्रि करणाखाली शक्यतो त्यांना एकाच तालुक्यात नेमणूक दिल्यास एक कौटुंबिक आधार मिळून उठावदार काम देखील होऊ शकते.

जिल्हास्तरावर व विभागीय स्तरावर त्यांची संख्या पाहून त्यांच्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षणाची सोय करणे त्यांना वेगवेगळ्या शासकीय कामात संधी देणे, विविध कलागुणांना वाव देणे या मुळे त्यांना पुर्ण क्षमता साध्य करण्यासाठी सक्षम केले जाऊ शकते.  त्यामुळे एक आत्मविश्वास निर्माण होऊन त्या स्वतःला अजून सिद्ध करतील आणि सर्व बाजूंनी परिस्थितीला सामोरे जाऊन एकूण प्रगतीतील आपला वाटा सक्षमपणे उचलू शकतील यात शंका नाही.

डॉ. व्यंकटराव घोरपडे
सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली

Web Title: International Women's Day Special; Role and Expectations of Women Veterinarians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.