Join us

दूध भेसळ रोखण्यासाठी, स्थानिक पातळीवर दुग्ध प्रक्रियेची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2023 4:16 PM

देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, पुणे येथील कार्यक्रमात डॉ. प्रशांतकुमार पाटील, कुलगुरू, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांचे मत.

सध्या दुग्ध व्यवसायामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भेसळ होत असून दुधाचे दर खूप मोठ्या प्रमाणात कमी जास्त होत आहेत. त्यामुळे दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांना तोटा सहन करायला लागत आहे. त्यामुळे दुग्धोत्पादक शेतकरी स्थानिक पातळीवर उच्च दर्जाचे दुग्धजन्य पदार्थ तयार करून ग्राहकांचा विश्वास  संपादन करून दुग्ध व्यवसाय यशस्वी करू शकतात असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी  केले. देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, पुणे येथे देशी गाईंच्या दुधापासून सॉफ्टी आईसक्रीम बनवण्याच्या मशीनचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळेस ते बोलत होते.

सध्या दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भेसळ आढळून येत आहे. त्यामुळे अनेक लोक दुध व दुग्धजन्य पदार्थ खाण्यास घाबरत व टाळत आहेत. यात प्रामुख्याने पनीर, खवा या दुग्धजन्य पदार्थांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भेसळ सणासुदीच्या काळामध्ये दिसून येते. त्याचप्रमाणे छोट्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत आईस्क्रीम हा सर्वांचा आवडता पदार्थ असून यामध्ये सुद्धा दुधाऐवजी इतर वेगळे तेल वापरून आईस्क्रीम बनवले जाते. त्यामुळे देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राने देशी गाईच्या शुद्ध दुधापासून इन्स्टंट आईस्क्रीम व सॉफ्टी आईस्क्रीम बनविण्याचा व विक्री करण्याचा प्रकल्प पुणे कृषी महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर चालू केला आहे. सदरील प्रकल्पामध्ये इन्स्टंट आइस्क्रीम व सॉफ्टी आइस्क्रीम बनविण्याचे व विक्रीचे काम कृषी महाविद्यालयामध्ये कृषी पदवीच्या  चतुर्थ वर्षात अनुभवाधारीत शिक्षण घेणारे विद्यार्थी करीत आहेत. आबालवृद्धांच्या चेहऱ्यावर हसू आणणारे देशी गायीच्या दुधापासून बनविलेले ताजे स्वच्छ आइस्क्रीम बनवून विकण्याचे काम कमालीचे आनंददायी आहे असे मनोगत या विद्यार्थांनी व्यक्त केले.

याप्रसंगी देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने, तांत्रिक प्रमुख डॉ. धीरज कणखरे, डॉ. रवींद्र बनसोड, डॉ. संतोष मोरे, डॉ. ताई देवकाते, डॉ. मृणाल अजोतीकर, डॉ. जोतीबा कुंभार, भारतीय देशी दुधाळ गोवंश - साहिवाल क्लबचे उपाध्यक्ष श्री. रवींद्र लाड व महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.

टॅग्स :दूधदूध पुरवठाशेतकरी