Join us

ऐकावे ते नवलच! गाढविणीचे दूध १५ हजार रुपये लिटर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 12:00 PM

गाढविणीच्या दुधामुळे सर्दी, खोकला, कफ, डबा (ब्राँको न्यूमोनिया) पोटाचा आजार होतो बरा..

नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील गोळेगाव येथील मायलेक हिंगोली शहरासह ग्रामीण भागातही गाढविणीला सोबत घेऊन फिरत असून हे दूध पोट दुखणे, जुनाट खोकला, सर्दी आदी आजारांना उपयोगी आहे, असे ध्वनीक्षेपकाद्वारे सांगू लागले आहेत. जुनेजाणते लोक हे दूध घेऊ लागले असून दिवसाकाठी दीड हजार रुपयांचे दूध विक्री होत आहे असल्याचे सांगत आहेत.

गोळेगाव येथील देवकर यांनी पाच गाढविणींचा सांभाळ केला असून दिवसाकाठी त्यांना शेंगदाणा, सरकी पेंड खायला दिली जात असल्याचे सांगत आहेत. पुढील तीन-चार दिवस हिंगोली जिल्ह्यात थांबून इतर ठिकाणी घेऊन जाणार आहोत, असे लक्ष्मीबाई देवकर व दिलीप देवकर यांनी सांगितले. शहरात गेल्यानंतर गाढविणीच्या दुधाचे महत्व तोंडी सांगणे कठीण आहे म्हणून रेकॉडींग ध्वनीक्षेपकाद्वारे लोकांना माहिती दिली जात आहे.

खर्च वजा जाता ५०० रुपये मिळतात...

सध्या पाच गाढविणी आमच्याकडे आहेत. त्यांना भरपूर चारा द्यावा लागतो. गाढव असले तरी त्याला पाणी फिल्टरचे पाजावे लागते. होंदात भरून ठेवलेले पाणी पित नाहीत. चारा व इतर खर्च वजा जाता पाचशे रुपये पदरात पडतात. महागाईमुळे हा व्यवसायही परवडत नाही, असेही देवकर सांगत आहेत.

ब्राँको न्यूमोनिया (डबा), पोट दुखणे, जुना खोकला, सर्दी आदी आजारांवर गाढविणीचे दूध गुणकारी आहे. शहरात या दुधाला मागणी नसली तरी ग्रामीण भागात मात्र दूध औषधी म्हणून आवर्जून घेतात. या दुधापासून अपाय कोणताही होत नाही. -डॉ. गजानन धाडवे, आयुर्वेदिक तज्ज्ञ, हिंगोली

पाच हजारांनी झाली वाढ...

दोन वर्षापूवीं गाढविणीचे दूध आठ ते दहा हजार रुपये लिटर होते. आता महागाई कमी होण्याचे नाव घेत नाही, चारा, पेंड मोठ्या प्रमाणात महाग झाली आहे. दुधाची मागणी वाढली असून त्यामुळे दुधाचे भावही वाढले आहेत. पंधरा हजार रुपये लिटर दूध सध्यातरी आम्ही विकतो. फारच गरज असेल तर त्यात एक, दोन हजार रुपये कमीही करून देतो.

 

टॅग्स :दूधदुग्धव्यवसाय