Join us

ऐकावे ते नवलच! आखाडा बाळापुरात गाढविणीचे दूध पंधरा हजार रुपये लिटर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 1:50 PM

गाढविणीच्या दुधाने म्हणे पोट दुखणं राहतं म्हणत ही महिला विकतेय घरोघरी फिरून दूध.

रमेश कदम

दारोदारी, गल्लीत, चौकात ओरडून वस्तू विकणाऱ्यांची कमी नाही. भाजीपाला, दूध, दही, फळे विकत घेणे नित्याचेच आहे. परंतु चक्क 'गाढविणीचे दूध घेता का, दूध, असा आवाज तुमच्या अंगणात कुणी दिला तर आश्चर्य वाटेलच ना. यात दुसरे आश्चर्य म्हणजे गाढविणीचे दूध पंधरा हजार रुपये लिटरने विकले जात आहे.

एक सीताबाई नामक महिला एक गाढव घेऊन दारोदारी जाते आणि अनेक रोगांसाठी 'रामबाण' उपाय असा दवा करीत गाढविणीचे दूध घ्या, अशी हाक देते. अनेकांना याचे आश्चर्य तर वाटतेच आहे. त्यात काहींना हे दूध घ्यावे वाटतंय. तर काहींना गाढविणीचे दूध कसे प्यावे म्हणून लाज वाटते.

या सगळ्या शंका-कुशंका, काहीही असले तरी 'गाढविणीचे दूध' सध्या विक्रीला तुमच्या दारात येतेय हे मात्र खरे.

अंगणात काढून दिली जाते धार..

नांदेड जिल्ह्यातील स्टेशन (उमरी) येथील सीताबाई गेल्या दोन दिवसांपासून बाळापूर परिसरात गाढविणीचे दूध घरोघरी जाऊन विकत आहेत. त्या दुधाचे महत्त्व सांगतात. औषध म्हणून हे दूध किती उपयुक्त आहे, याची माहिती देत आहे. पन्नास रुपये, शंभर रुपये, दोनशे रुपये तुम्हाला जितके हवे तितके दूध लगेच तुमच्या अंगणात धार काढून देते.

त्यासाठी तिचे मोजमाप ठरलेले आहे. माझी गाढवीण आमच्या विश्वासावर पान्हा पाहिजे तेव्हा सोडते. अशा तीन ते चार व्यालेल्या गाढविणी आहेत. अनेकजण हे दूध शोधत शोधत येतात. पण ऐनवेळी मिळत नसते. सध्या मात्र चार गाढविणी व्यालेल्या असल्यामुळे ते उपलब्ध आहे म्हणून विकते असे ती सांगते.

दमा, पोटदुखीवर एकच उपाय गाढविणीचे दूध..

दोन दिवसांपासून आखाडा बाळापूर आणि परिसरातील गावांमध्ये एक महिला हातात गाढविणीला धरून दारोदारी आवाज देते. दमा, खोकला, लहान लेकराच्या पोटातले येणे, पित्त, अंग खाजणे, पित्ताशयाचे आजार अशा अनेक रोगांवर जालीम उपाय म्हणून गाढविणीचे दूध औषध असल्याचे ठामपणे सांगितले जात आहे.

आजपर्यंत फळे, पालेभाज्या, दूध, दही, ताक, लोणी, तूप, हे विक्री करण्यासाठी अनेकदा आवाज ऐकले. ते अंगवळणीही पडलेत पण 'गाढविणीचे दूध घ्या' हे आवाज मात्र माणसाला आश्चर्यकारक वाटत आहे.

दुधामुळे अपाय होत नाही..

अनेकजण गाढविणीचे दूध आपल्या बाळांना पोटदुखी कमी व्हावी म्हणून देतात. चाळीस वर्षांपूर्वी गाढविणींची संख्या अधिक होती. त्यामुळे पाचशे, सहाशे रुपयांना किंवा कमी-जास्त करून २०० रुपयांना लिटरभर गाढविणीचे दूध मिळायचे. परंतु हल्ली गाढवीण सांभाळणे अवघड झाले आहे. कारण, तिला म्हणावा तसा चाराही मिळत नाही. त्यामुळे तर हे आयुर्वेदिक दूध पंधरा हजार रुपये लिटरने विकावे लागत आहे. - दिलीप देवकर, उमरी स्टेशन.

हेही वाचा - White Jamun Success Story बुटक्या जातीचे सफेद जांभूळ शेतकऱ्यांसाठी वरदान

टॅग्स :दुग्धव्यवसायनांदेडनांदेडमराठवाडाशेतकरीशेती क्षेत्र