IVF technology in cow : भ्रूण प्रत्यारोपणाद्वारे जातिवंत जनावरांचा होणार जन्म एका देशी, संकरित गायीमध्ये वर्षाकाठी दहा कालवडी किंवा वळूला जन्म देणारे भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील गायींवर करण्यात आले आहे. या तंत्रज्ञानापासून निर्मित ही जनावरे यंदाच्या राज्यस्तरीय ॲग्रोटेक २०२४ मध्ये आकर्षण असणार आहेत.
भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व राज्य शासनाच्यावतीने २७ डिसेंबरपासून ३ दिवस अकोल्यात राज्यस्तरीय ॲग्रोटेक २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. यात कृषी विद्यापीठाने प्रथमच गायींमध्ये भ्रूण प्रत्यारोपण करून जातिवंत वळू, वासरे जन्माला घातली आहेत.
ग्रामीण भागात दुग्धोत्पादनात वाढ व्हावी, या अनुषंगाने ॲग्रोटेकमध्ये या तंत्रज्ञानापासून जन्मलेल्या कालवड, वळूला ठेवले जाणार आहे.
सध्या देशी व संकरित गाय ही वर्षातून एकच कालवड किंवा वळूला जन्माला घालते; परंतु भ्रूण प्रत्यारोपणामुळे हीच एक गाय वर्षातून १० कालवड किंवा वळूला जन्म घालणार आहे, याकरिता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला नागपूरच्या महाराष्ट्र राज्य पशू व मत्स्य विद्यापीठाने (माफसू) तंत्रज्ञान दिले आहे.
असा होणार जन्म
* नागपुरात प्रयोगशाळा असून, 'माफसू'कडे गौळावू, देवणी, डांगी, लाल कंधार व पंजाबची सायवाल व गुजरात राज्यातील गीर गायींचे संगोपन करण्यात आले आहे.
* या गायींची २० ते ३० लिटर एका दिवसाची दूध देण्याची क्षमता आहे. याच गायीतील स्त्रिबीज शोषून घेऊन ते ७ दिवस इनक्यूबेटरमध्ये ठेवले जाते. तेथे त्याचे फलन झाल्यानंतर देशी गायींना त्यासाठी औषधे देऊन तयार करून ते भ्रूण गायीत टाकण्यात येते.
* एका महिन्यात ही गाय एका वासराला जन्म देते. म्हणजेच वर्षाला एक वासरू जन्माला घालणारी गाय दहा वासरांना जन्म देते, अशी माहिती 'माफसू'चे शास्त्रज्ञ डॉ. मनोज पाटील यांनी दिली.
अकोल्यातील स्नातकोत्तर पशुवैद्यकीय व पशू विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. चैतन्य पावसे, डॉ. एस. जी. देशमुख, डॉ. एम. बी. इंगवले, डॉ. पंदेकृविच्या पशुसंवर्धन विभागाचे प्रमुख डॉ. शेषराव चव्हाण व डॉ. शेळके यांनी सहकार्य केले.
सेंद्रिय शेती व नव्या तंत्रज्ञानावर भर
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेले तसेच राज्य देशातील कृषी संस्थांनी विकसित नवे तंत्रज्ञान ॲग्रोटेक- २०२४ मध्ये आकर्षण असेल, यात नवे कृषी यंत्रासह नवे वाण, बियाण्यांचा समावेश राहील.