सध्या एकूणच तापमानात वारंवार बदल होत आहे. गार गरम वातावरणामुळे निश्चितच सर्वांच्या गोठ्यात गोचीडांची वाढ मोठ्या प्रमाणात होत असणार. या Gochid Tap गोचीडांच्या प्रादुर्भावामुळे जनावरांना मोठ्या प्रमाणात गोचीड तापाची लागण होताना दिसते.
गोचीड तापामध्ये प्रामुख्याने थायलेरिओसिस, बबेसिओसिस आणि ॲनाप्लास्मोसिस हे महत्त्वाचे आजार आहेत. तथापि थायलोरेसिस या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळतो.
संकरित गाई व म्हशीमध्ये हा रोग प्रामुख्याने आढळतो. म्हैशीमध्ये लक्षणे सौम्य असतात. पण संकरित व विदेशी गाई मध्ये अतितीव्र लक्षणे आढळतात.अलीकडे सातारा जिल्ह्यात शेळ्या मेंढ्यांमध्ये सुद्धा या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे.
सन २०१९ मध्ये शिरवळ येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात सातारा जिल्ह्यातील शेळ्या-मेंढ्यांचे रक्त नमुने ज्यावेळी तपासले गेले त्यावेळी या रोगाचे निदान झाले आहे. ज्यावेळी बाधित गोचीड निरोगी जनावरांना चावतो त्यावेळी या रोगाचा संसर्ग व प्रसार होतो.
या रोगाला कारणीभूत असणारे रक्तआदिजीवी (प्रोटोझुवा) यांच्या जीवन चक्रातील विशिष्ट टप्प्यातील जंतू ज्या वेळेला गोचीडाच्या शरीरात प्रवेश करून गोचीड बाधित करतात असे गोचीड जेव्हा जनावरांना चावतात त्यावेळी या थायलेरियासिस रोगाचा प्रादुर्भाव होतो.
रोगाची लक्षणे
१) जनावरांना ताप येतो.
२) पुढील व मागील पायाच्या फऱ्यासमोर असणाऱ्या लसिका गाठी (लिंफ नोड्स) सुजतात.
३) सुरुवातीला जनावर खात असते पण नंतर चारा खाणे बंद करतात.
४) लाळ गळते.
५) जलद व उथळ श्वासोच्छ्वास सुरू होतो.
६) हळूहळू रक्तक्षय (ॲनिमिया) होतो.
७) डोळे, योनी येथील स्लेषमल त्वचा पिवळट व पांढरट दिसायला लागते.
८) पुढे पुढे रक्तातील हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे गोठ्यातील, भिंतीवरील किंवा दावणीत मिळेल तेथे माती चाटण्याचा प्रयत्न करतात.
९) वेळेत निदान व उपचार न झाल्यास जनावर दगावते.
कसा कराल उपचार
१) या आजारात जनावर सुरुवातीला वैरण खात असते. त्यामुळे पशुपालकांच्या लक्षात येत नाही.
२) पण चाणाक्षपणे लक्षणीयपणे दूध उत्पादन घटने, वैरण खाणे, जनावरांचे ढासने (खोकणे) याकडे लक्ष दिल्यास पशुपालकांना आपले जनावर आजारी पडल्याचे लक्षात येउ शकते.
३)पुढे तज्ञ पशुवैद्यकाच्या मदतीने त्याचे योग्य निदान व योग्य उपचार करून घ्यावेत.
४) सुरुवातीच्या टप्प्यात तात्काळ निदान झाल्यास हा रोग ताबडतोब बरा होतो. पण उशीर झाल्यास मात्र उपचाराचा खर्च वाढतो त्याचबरोबर बरे होण्याची शक्यता देखील कमी होते.
प्रतिबंधात्मक उपाय
१) या रोगाच्या नियंत्रणासाठी गोचीड नियंत्रण हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे.
२) सोबत तीन महिन्यावरील सर्व संकरीत जनावरांना या रोगाविरुद्ध लसीकरण करून घ्यावे.
३) ज्या ज्या वेळी आपण नवीन जनावर खरेदी करतो त्या त्यावेळी ते जनावर गोठ्यात कमीत कमी २१ दिवस वेगळे बांधून त्यावर लक्ष ठेवावे.
४) अंगावरील गोचीड निर्मुलन करून मगच मुख्य गोठ्यात आणावे.
अनेक वेळा अंगावर गोचीड नसताना देखील या रोगाचा प्रादुर्भाव होतो. या रोगास कारणीभूत असणारे जंतू सुप्तावस्थेत शरीरात राहतात. वातावरणातील बदल, कमी झालेली प्रतिकारशक्ती, जनावरांची होणारी वाहतूक, शारीरिक ताण यामुळे ते डोके वर काढून रोगाची लागण करतात.
या सर्व बाबी लक्षात घेऊन सर्व पशुपालकांनी या रोगाबाबत काळजी घ्यावी व आपले मौल्यवान पशुधन या रोगापासून वाचवावे.
डॉ. व्यंकटराव घोरपडे
सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली
अधिक वाचा: गाई-म्हशीतील संसर्गजन्य गर्भपात कशामुळे होतो व तो कसा टाळता येईल?