तुषार हगारे
भिगवण : सतत कमी असलेला दुधाचा दर, वाढलेले पशुखाद्याचे दर, कोलमडलेले दूध धंद्याचे अर्थकारण यामुळे जनावरांच्या बाजारात गाईचे दर कमालीचे पडलेले आहेत. गेल्या चार महिन्यांपासून जनावराच्या बाजारांमध्ये उठाव दिसून येत नसल्याने १ लाख रुपये किमतीची गाय २५ ते ३० हजार रुपयांना मिळत आहेत.
यामुळे लाखो रुपयांचे कर्ज काढून या धंद्याकडे वळलेल्या बारामती, इंदापूर, दौंड परिसरातील तरुण शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. वर्षभरापासून दूध दरात वाढ न होता कपात होत असल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागतोय.
त्यातच पशुखाद्याचे वाढलेले दर यामध्ये १३०० रुपयांना मिळणारी गोळीपेंडीची बॅग १७०० रुपयांना झाली आहे. सद्य:स्थितीत ३.५ फॅट ८.५ एसएनएफ असणाऱ्या दुधाला २८ रुपये दर मिळत आहे.
सरकारने ही तूट भरून काढण्यासाठी दुधाला आधी ५ रुपये व नंतर वाढवून ७ रुपये अनुदान दिले. तरी विकतचा चारा, कामगार, पशुखाद्य याचा ताळमेळ बसत नसल्याने अनेक गाईंचे मोठे गोठे ओस पडल्याचे दिसत आहे.
दुभत्या जनावरांचे दर चाळीस ते साठ टक्क्यांनी खाली आले आहेत. बाजारातील आवक कमी झाली आहे. दुधाला दर नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. यामुळे दुभत्या जनावरांच्या खरेदी-विक्रीवरही गंभीर परिणाम झाला आहे.
बारामती, राशीन (ता. कर्जत), काष्टी (ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) येथे जनावरांचे बाजार भरतात. या बाजारात दुभत्या गाई, म्हशींची मोठ्या प्रमाणात विक्री होते. या बाजारामध्ये दुभत्या गाईंनाच दर नसल्याने भाकड गाई विकायच्या कशा, हा प्रश्न निर्माण होत आहे.
शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आणि दूधडेअरी, संघ चालक यांच्या मनमानी कारभारमुळे दूध उत्पादक शेतकरी धुळीस मिळाला आहे. आज गाईचे दर १,३०,००० हजारांवरून ३० ते ४० हजारांवर आले आहेत. त्यामुळे शेतकरी गोटे विकत आहेत. ही परिस्थिती अशीच राहिली तर दूध धंदा बंद होण्याची शक्यता आहे. - सुप्रिया दराडे, गोठामालकीण
एकीकडे गोळी पेंडचे बाजार भाव वाढत आहेत आणि दुसरीकडे दुधाचे दर कमी होत आहेत तसेच अनुदानसुद्धा पूर्ण मिळत नाही. - सुचित्रा दराडे
दूध दर २८ रुपये झाल्यामुळे गायींचे दर पडलेले आहेत. सद्यःस्थितीत गाभण असणारी ४ महिन्यांची ५० हजारांची गाय २० हजारांना घेतली जात आहे. भाकड गाय १० ते १८ हजारांपर्यंत घेतली जातेय. - रमेश कदम, व्यापारी वाटलूज, ता. दौंड
अधिक वाचा: Dudh Anudan : दूध अनुदान योजना संपणार नोव्हेंबरचे अनुदान कधी मिळणार