गणेशवाडी : शिरोळ तालुक्यात कर्नाटक राज्यात लहान मुलांना देण्यात येणाऱ्या दूध पावडरचा शिरोळ तालुक्यात काळाबाजार करून अनेक मोठे व्यावसायिक दूध पावडर घेऊन येत असतात. ही पावडर जयसिंगपूर शहरातील एका गोडाऊनमध्ये येऊन ती पावडर लेबल बदलून थेट नवी दिल्लीला पाठवण्याचे मोठे रॅकेट असल्याची चर्चा सुरू आहे.
इचलकरंजी शहराजवळील एका गावामध्ये याचा साठा केला जात असल्याचे समजते. त्यामुळे कर्नाटक व्हाया महाराष्ट्र ते थेट नवी दिल्ली असा काळाबाजार केलेल्या दूध पावडरचे रॅकेट असल्याचे जयसिंगपूर शहरातून बोलले जात आहे. त्यामुळे या रॅकेटच्या मुळाशी जाऊन कारवाई होणे गरजेचे आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष लागून राहिले आहे. कर्नाटक राज्यात शालेय पोषण आहारामध्ये लहान मुलांना दूध पावडरचे वाटप करण्यात येते. प्रत्येक विद्यार्थ्याला मुबलक प्रमाणात दूध पावडर येत असल्याने यामध्ये काळाबाजार करून अनेक व्यापारी कर्नाटकमध्ये पोहोचून तेथील दूध पावडर एकत्रित करून ती शिरोळ तालुक्यात अनेक वर्षांपासून आणली जात असल्याचे अनेकदा कारवाईच्या माध्यमातून समोर आले आहे.
गेल्या तीन दिवसांपूर्वी कागवाड पोलिसांनी कर्नाटक राज्यातून गणेशवाडी मार्गे शिरोळमध्ये येणार सुमारे तीन टन दूध पावडर जप्त केली होती. याप्रकरणी तिघांच्य विरोधात गुन्हाही दाखल झाला होता या दूध पावडरीच्या रॅकेटचे पाळेमुळे शोधताना पोलिसांनीही हात आवळता का घेतला हे मात्र समज शकले नाही.
जयसिंगपूर शहराबरोब इचलकरंजी शहराला लागून असणाऱ्या एका गावात कर्नाटक पोलिसांनी तपास केला असल्याच समजते. मात्र, हे पथक माघारी गेल्याने आर्थिक तडजोड करून संबंधित व्यापाऱ्याने यंत्रणेचे हात चांगलेच ओले केल्याची चर्चा रंगली आहे.
अन्न, औषध प्रशासन गप्प का?
कर्नाटक राज्यातून सर्रासपणे येणारी ही पावडर अन्न, औषध प्रशासनाला माहीत असूनसुद्धा कारवाई केली जात नाही. इतकेच नव्हे, तर शिरोळ तालुक्यातील दूध व दुग्धजन्य पदार्थांपासून होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न, औषध प्रशासन गप्प का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अधिक वाचा: बायोगॅससाठी गोकुळने राबविली हि योजना, पशुपालकांना कसा मिळतोय लाभ