Join us

कार्तिकीच्या बाजारात दोन कोटींची उलाढाल, काळी कपीला ठरली आकर्षणाचा विषय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 5:00 PM

३५०० पशुंची आवक : पंढरपूरच्या कपिला गायीला सर्वोच्च पाच लाखांची बोली

पंढरपूर कार्तिकी यात्रेनिमित्त वाखरी पालखी तळावर भरलेल्या बाजारात साडेतीन हजारांहून अधिक जनावरे दाखल झाली होती. त्यामध्ये दोन हजारांहून अधिक जनावरांची विक्री झाली असून, दोन कोटी ८ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. या बाजारातपंढरपूरच्या पहिलवान नितीन घंटे यांच्या कपिला गायीला तब्बल पाच लाखांची सर्वोच्च बोली लावण्यात आली.

कार्तिकी यात्रेनिमित्त तीन वर्षांनंतर वाखरी येथील पालखी तळावर तीन ते चार दिवस जनावरांचा बाजार भरलेला होता. चार दिवसांत बाजार समितीकडे ३ हजार ३४५ जनावरांची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक बैल, खिलार गाय, म्हैस आणि रेडा, संकरित गायी अशी जनावरे विक्रीसाठी आली होती.

तीन वर्षांनंतर बाजार भरला असल्याने जनावरांची आवक मोठ्या संख्येने झाल्याने पालखी तळाची जागा अपरी पडल्याचे दिसत होते. त्यामुळे आसपासच्या खासगी जागेत जनावरे बांधण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. नोंदणी कमी असली तरी किमान पाच हजार जनावरे बाजारात दाखल झाली असावीत असा अंदाज शेतकरी आणि दलाल यांच्याकडून व्यक्त होत होता.

काळी कपिला ठरली बाजाराचे आकर्षण

पंढरपूर कार्तिक यात्रा जनावरे बाजारात एकापेक्षा एक विविध प्रकारची जनावरे विक्रीसाठी आली असली तरी नितीन घंटे यांच्या काळ्या रंगाच्या कपिला गायीला तब्बल पाच लाखांची बोली लावण्यात आल्याने बाजारात ती मुख्य आकर्षण होती. त्यामुळे शेतकऱ्यांसह दलाल, पशुपालकांची या गायीला पाहण्यासाठी गर्दी होत होती. पाच लाखांची बोली येऊनही पशुपालक घंटे यांनी या गायीची विक्री केली नाही. आपल्याला खिलार गाय सांभाळण्याचा छंद आहे. म्हणूनच आपण या गायीचे संगोपन केल्याचे त्यांनी सांगितले.

तीन वर्षानंतर भरलेल्या जनावरांच्या बाजारात पशुपालकांना बाजार समितीने वीज, पाणी, वैद्यकीय सुविधा पुरविल्या. जागा, स्वच्छताही करून दिली. त्यामुळे या बाजाराला राज्यभरातील शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. - हरीश गायकवाड, सभापती, पंढरपूर बाजार समिती

चार दिवसांच्या या बाजारात १८०४ जनावरांची विक्री झाली असून, एकूण दोन कोटी आठ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. सहा महिन्यांच्या खोंडाला दहा हजार रुपयांपर्यंत किंमत मिळाली असून, बैलांचे व्यवहार ५० ते ६० हजार रुपये, तर म्हशींच्या किमती लाखाच्या वर गेल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

टॅग्स :गायबाजारदुग्धव्यवसायशेतकरीपंढरपूर