गोपालन व्यवसायाचा विस्तार पहाता काही सूत्रे गोपालकाने त्याच्या मनावर वारंवार बिंबवणे महत्त्वाचे आहे. या सर्व सूत्रांपैकी ५ प्रमुख सूत्रे अत्यंत महत्त्वाची आहेत.
यामध्ये मुबलक पिण्यायोग्य पाणी, सकस कुट्टी केलेला चारा, मीठ, क्षार मिश्रण आणि खाण्याचा सोडा यांचा समावेश होतो. यालाच ‘दुग्धव्यवसायाची पंचसूत्री’ असे म्हणतात.
✦ पाणी
प्रत्येक गायीला २४ घंटे पिण्यायोग्य मुबलक पाणी मिळणे आवश्यक आहे. पाण्यामुळे पचन झालेले अन्नघटक सर्व शरीरभर पसरून कासेपर्यंत आणले जातात. तसेच रक्ताचा प्रवाहीपणा वाढतो. प्रत्येक लिटर दूध उत्पादनासाठी ३-४ लिटर अतिरिक्त पाण्याची आवश्यकता असते.
✦ चारा कुट्टी करणे
• चाऱ्याच्या बुडक्याकडील भागात अधिकाधिक अन्नघटक असतात; पण गायींना शेंड्याकडील भाग खाणे आवडते. परिणामी अधिक अन्नघटक असलेला चारा वाया जातो.
• त्यामुळे असा अधिक अन्नघटक असलेला चाऱ्याचा भाग जनावरांच्या आहारामधून पोटात जाणे आवश्यक असते. यासाठी चार्याची एक ते दीड इंच लांबीची कुट्टी होणे आवश्यक आहे. याहून चाऱ्याची अधिक लांबीची कुट्टी झाल्यास गायीचे दूध उत्पादन घटते किंवा याहून अल्प लांबीची कुट्टी झाल्यास दुधातील तुपाचे प्रमाण अल्प होते. त्यामुळे योग्य प्रमाणावर कुट्टी होणे गरजेचे आहे.
✦ मीठ
मिठामुळे रक्ताची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. त्यामुळे अधिकाधिक अन्नघटक असलेले रक्त कासेपर्यंत वाहून नेण्यास सहाय्य होते. परिणामी दुधाचे प्रमाण वाढते.
✦ खनिज मिश्रण (Mineral Mixture)
• गायींच्या शरिरातील सर्व रासायनिक क्रिया, नैसर्गिक स्रावांची निर्मिती, आरोग्य रक्षण, दूध उत्पादनातील सातत्य, पुनरुत्पादन क्षमता टिकून रहाणे आणि दुधातून प्रतिदिन शरिराबाहेर टाकल्या जाणाऱ्या क्षारांचे प्रमाण संतुलित रहाणे या क्रियांसाठी विविध क्षारांची आवश्यकता असते.
• यासाठी प्रत्येक गायीला प्रतिदिन तिच्या दुधाची उत्पादन क्षमता आणि गाभण कालावधी यांनुसार ५० ते १०० ग्राम खनिज मिश्रण मिळणे आवश्यक असते.
✦ खाण्याचा सोडा
पचन क्रिया योग्य रितीने सुरू राहण्यासाठी आठवड्याला ४०-५० ग्रॅम खाण्याचा सोडा खुराकातून गुरांना देणे गरजचे आहे.
डॉ. फारूक रुबाब तडवी
विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र)
डॉ. राहुल लक्ष्मण कदम
विषय विशेषज्ञ (विस्तार शिक्षण)
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी, कृषि विज्ञान केद्र, बदनापूर.
हेही वाचा : अहो ... सरपंच साहेब विसरू नका बरं; 'या' आहेत तुमच्या कामाच्या जबाबदारी