Join us

दूध काढतांना हे ठेवा ध्यानी; व्यवसायातून मिळेल हमखास मनी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 4:56 PM

परंपरागत पध्दतीप्रमाणे आपण हाताने दुध काढतो. तर अधिक दुध देणा-या गाईचे दुध आपण नवीन तंत्रज्ञानाप्रमाणे निघलेल्या यंत्राच्या सहाय्याने काढतो. मात्र यात बर्‍याचदा काही चुका होतात त्या कोणत्या ते वाचा सविस्तर.

दुभत्या जनावरांचे दुध काढताना आपण कशा प्रकारे काळजी द्यायला पाहिजे. भरपुर प्रमाणात शेतकरी किंवा मजुर वर्गाला जमत नाही. या सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुभत्या वा दुधाळ गाईची व म्हशींची धार कशा प्रकारे काढायची हे सुध्दा एक शास्त्र आहे. जनावरांच्या कासेत तयार दुध वासरू प्यायल्यानंतर उरलेले दुध आपण काढतो. त्याचप्रमाणे जनावरांचे दुध काढण्याच्या काही ठराविक शास्त्रीय पध्दती आहेत.

परंपरागत पध्दतीप्रमाणे आपण हाताने दुध काढतो. तर अधिक दुध देणा-या गाईचे दुध आपण नवीन तंत्रज्ञानाप्रमाणे निघलेल्या यंत्राच्या सहाय्याने ही काढू शकतो या पध्दतीत मनुष्यबळ कमी लागते व दुध काढण्यासाठी प्रक्रिया लवकर पार पडते. मात्र मनुष्यबळ खुप असल्याने आपल्याकडे सरसकट अशी परिस्थिती नाही. गाय ही सवयीची गुलाम आहे. त्यामुळे दुध काढण्यासाठी जशी सवय तुम्ही लावाल त्याप्रमाणे त्या गाईला लागातात. यासाठी खालील काही बाबी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

१) दुध काढण्याच्या रोजच्या वेळा कटाक्षाने पाळल्या पाहिजेत. दुभत्या गाईसाठी सुटटी विश्रांती किंवा संप नसतो. दुध काढण्यापुर्वी किमान अर्धा तास गोठा झाडुन साफ करावा. गव्हाणीत प्रत्येक गाईचे अंबवण (खाद्य-भरडा) टाकुन तयार ठेवावा.

२) गाईला नेहमी ममतेने हाताळावे व तिच्या अवतीभवती मोठ्या आवाज किंवा आरडाओरड टाळावी. दुध काढण्यापुर्वी कास स्वच्छ चोळुन धुवावी त्यासोबतच शेपटी, कासेजवळचा व पोटाचा भागही स्वच्छ पाण्याने धुवावा. हिवाळ्यात कोमट पाणी घ्यावे व त्या पाण्यात थोड्या प्रमाणात पोटॅशियम परमॅगनेट टाकावे.

३) कास कोरडी करताना ती सडाच्या टोकापासुन करावी. त्यासाठी प्रत्येक गाईला वेगवेगळे कापड वापरावे. पुन्हा वापरण्यापुर्वी ते फडके स्वच्छ धुऊन उन्हात वाळवुन घ्यावे.

४) कास कोरडी झाल्यावर भराभर गाईला इजा न होता दुध काढावे. दुध जेवढ्या वेगाने काढले जाईल तेवढी ती कास रिकामी होऊन अधिक दुध मिळते. कास धुणे, कोरडी करणे, धार काढणे या गोष्टी सात ते आठ मिमिटांत संपणे आवश्यक आहे. दुध काढताना गाईने पान्हा सोडण्यासाठी तिच्या रक्तात जे द्रव्य असते त्याचा परिणाम हा सात ते आठ मिनिटांचा असतो त्याच वेळी गाय पान्हवते व नंतर हे प्रमाण कमी होते.

५) दुध काढताना हाताची बोटे आणि तळवा यांत सड धरुन दाबुन काढावे. यासाठी अंगठा तळव्यामध्ये दुमडु नये. त्यामुळे सडाला इजा होते. दुध काढताना सडाला पाणी तेल व दुध लावणे घातक आहे. याउलट त्यामुळे सडात रोगजंतु शिरण्याची जास्त शक्यता असते.

६) ज्या गाई दिवसात १३  ते १५ लिटर दुध देतात त्यांना दिवसातुन दोनदा पिळावे. मात्र ज्या गाई दिवसातुन १५ लिटरपेक्षा अधिक दुध देतात त्यांना दिवसातुन तिनदा पिळावे. दोन पिळण्यामधील अंतर १६ तासांपेक्षा अधिक असु नये.

७) दुध काढण्याच्या वेळेला ज्या गाईला ताज्या व्यालेल्या आहेत त्या अगोदर पिळाव्यात. ज्या गाईंना तीन महिन्यापेक्षा अधिक काळ झाला असेल त्यांना नंतर पिळावे. ७ महिन्यांपेक्षा जास्त दिवस झालेल्या गाई शेवटी पिळाव्यात.

८) चांगल्या दुध काढणारा मनुष्य सात ते आठ मिनिटांत १२ लिटर दुध काढु शकतो. पण त्याचा हाताचा वेग त्याची ताकद एक दोन गाईपुरतीच टिकते नंतर कमी होते. दुध काढण्यार्‍या एका माणसाने एका वेळेला ८० ते ९० लिटर दुध काढले पाहिजे. म्हणजे एका माणसाला जवळपास १३० ते १५० लिटरपेक्षा कमी दुध काढणारा माणुस पुर्ण वेळासाठी परवडत नाही.

ब-याच ठिकाणी दुध काढणार्‍या मजुरास रोज पैसे दिले जातात. (उदा. रुपये २ ते २.५० प्रति लिटर) मात्र लहान वासरे गाईंच्या अंगावर पीत नसतील तरच ही चांगली पध्दत आहे. अन्यथा दुधाच्या प्रमाणात पैसे मिळतात म्हणुन हा माणुस वासरांना उपाशी ठेवु शकतो.

९) ब-याच वेळेस भरपुर असे मोठे बागायतदार शेतकरी असतात की, ज्यांच्याकडे दुध काढण्यासाठी एक ठराविक माणसांकडुन गाई पिळणे सुरु असते यामुळे गाईला त्या माणसाची सवय होते व काही कारणामुळे तो माणुस आला नाही तर याचा परिणाम त्या गाईच्या दुध देण्यावर होतो त्यामुळे गाई कमी दुध देते.

१०) सर्वप्रथम आपण हे तपासून घेणे आवश्यक आहे की, आपण ज्या व्यक्तीकडुन गाईला पिळवुन घेतो त्या व्यक्तीने त्याची हाताची नखे काढली आहेत ना किंवा त्याला काही संसर्गजन्य आजार नाही ना याची खात्री करावी.  तसेच दुध काढताना सोयीची असलेली दोन सडे आधी पिळावीत.

११) आपल्या गोठयात १५ लिटरपेक्षा अधिक दुध देणा-या २० ते ३० गाई असतील आणि चांगले दुध काढणारे मिळत नसतील व रुपये ३०० पेक्षा अधिक रोजंदारी द्यावी लागत असेल तरअशा ठिकाणी यंत्राने दुध काढणे आपणांस सोयीचे होईल.

सध्या चांगल्या कंपन्यांची दुध काढण्याची यंत्रे सर्व जिल्हयात उपलब्ध आहे त्यात आता नव्या आणि प्रंगत तंत्रज्ञानानुसार एकाच वेळी दोन गाईचे दुध काढण्याची सोय देखील आहे. या व अशा प्रकारे आपण गाई म्हशींचे दूध काढले आणि स्वच्छता राखली तर आपल्या गोठ्यात कधीच कासेचे आजार येणार नाही.

डॉक्टर श्रीकांत मोहन खुपसे सहायक प्राध्यापक, एम जी एम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय, गांधेली, छत्रपती संभाजीनगर मो.नं. ८६०५५३३३१५वडॉक्टर एन. एम. मस्केप्राचार्य, एम जी एम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय, गांधेली, छत्रपती संभाजीनगर

टॅग्स :दूधगायदुग्धव्यवसायशेतीशेतकरी