Join us

जनावरांच्या आहारातील 'हे' सोपे उपाय ठेवा ध्यानी; उन्हाळ्यात देखील असेल परिपूर्ण दूध उत्पादनाची हमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 21:49 IST

Tips For High Milk Production In Summer : हिरवा आणि कोरड्या चाऱ्याचा पुरेसा पुरवठा न होण्यामुळे जनावरांच्या आहारात मोठे बदल घडतात, ज्याचा परिणाम त्यांच्या रवंथावर आणि दूध उत्पादनावर होतो.

उन्हाळ्याच्या काळात चाऱ्याची टंचाई आणि अती उष्णतेमुळे जनावरांच्या दूध उत्पादनात घट होण्याची समस्या अनेक शेतकऱ्यांना भेडसावत असते.

हिरवा आणि कोरड्या चाऱ्याचा पुरेसा पुरवठा न होण्यामुळे जनावरांच्या आहारात मोठे बदल घडतात, ज्याचा परिणाम त्यांच्या रवंथावर आणि दूध उत्पादनावर होतो.

अशा परिस्थितीत दूध उत्पादन वाढविण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी उपाय पुढील प्रमाणे आहेत.

आहारातील बदल करणे

• उन्हाळ्यात जनावरांना हिरव्या चाऱ्याची कमतरता भासल्यास त्यांच्या आहारात चाऱ्याचे प्रमाण कमी करणे आणि पशुखाद्य किंवा खुराक वाढविणे हे योग्य ठरते.

• यामुळे जनावरांना आवश्यक असलेल्या तंतुमय पदार्थांचे प्रमाण कमी होऊन शुष्क पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढते. यामुळे दूध उत्पादनात एक ते दीड लिटरपर्यंत वाढ होऊ शकते.

ऊर्जेचा पुरवठा वाढविणे

• उन्हाळ्यात दूध उत्पादन वाढवण्यासाठी आहारात ऊर्जेचं प्रमाण वाढवायला हवं. यासाठी स्निग्ध पदार्थ किंवा बायपास फॅटचा वापर केला जातो. यामुळे जनावरांचा उष्णतेचा ताण कमी होतो आणि त्यांची शरीराची कार्यक्षमता सुधरते.

• बायपास फॅटचा वापर शरीरात ऊर्जा निर्माण करतो आणि दूध उत्पादन वाढवतो. मात्र यामध्ये फॅटचे प्रमाण ५-७% पेक्षा जास्त नसावे.

चाऱ्याचा योग्य वापर

• उन्हाळ्यात जनावरांना हिरवा किंवा कोरडा चारा योग्य प्रमाणात मिळावा यासाठी काही महत्त्वाचे उपाय आहेत. चारा खाण्याचे प्रमाण कमी झाल्यास, आहारातील पोषक घटक वाढवावेत.

• यासाठी पशुखाद्य, पेंडी आणि इतर घटकांचा वापर केला जातो. जनावरांना चारा थोड्या थोड्या वेळात देणे आणि त्यांना थंड वातावरणात चारा खाण्यास देणे हे योग्य ठरते. तसेच हिरव्या चाऱ्याची कुट्टी करून वाळलेला चारा मिसळून देणे फायदेशीर ठरते.

फॅटच्या प्रमाणाची काळजी घ्या

• उन्हाळ्यात आहारात फॅटचे प्रमाण ५-७% पेक्षा जास्त नसावे. तेलबियांचा वापर ३०-४०% च्या दरम्यान ठेवावा.

• बायपास फॅटचा वापर १५-३०% असावा. यामुळे जनावरांना चांगले पोषण मिळते आणि दूध उत्पादनात सुधारणा होते.

उष्णतेचा प्रभाव कमी करणे

• उन्हाळ्यात उष्णतेचा अधिक ताण जनावरांच्या आरोग्यावर होऊ शकतो.

• त्यामुळे जनावरांच्या शरीरावर उष्णतेचा परिणाम कमी करण्यासाठी योग्य आहार, पाणी आणि सावली उपलब्ध करणे महत्त्वाचे आहे.

डॉ. असरार अहमदसहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन(विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा, छत्रपती संभाजीनगर)

हेही वाचा : नारळाच्या नियमित सेवनाने मिळेल उभारी; सदृढ आरोग्याची नारळ आहे गुरुकिल्ली

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीदूधगायदुग्धव्यवसायउष्माघात