Join us

ऐन हंगामात सर्जा राजा ऑन डिमांड; बैल बाजारात तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 12:37 PM

आजही शेती करण्यासाठी बैल हा अविभाज्य घटक मानला जातो, परंतु सध्या बैल जोडीचे भाव वधारले.

मोखाडा : तालुक्यात आजही शेती करण्यासाठी बैल हा अविभाज्य घटक मानला जातो, परंतु सध्या बैल जोडीचे भाव वधारले असून वयानुसार बैलजोडीची किंमत ठरत असल्याने जोडी मागे किमान हजार ते दोन हजार रुपयांची वाढ झालेली आहे.

खरीप हंगामातील पेरणीच्या तोंडावर तालुक्यातील बहुतांश शेतकरी मृग नक्षत्राच्या सुरुवातीला बैलजोडी खरेदी करून हंगाम संपल्यावर दिवाळीला परत विकून मोकळे होत असतात. 

४० हजार रुपयांच्या पुढे सर्व साधारण बैलजोडीला पैसे मोजावे लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. बैल बाजारात दावणीला बांधलेल्या बैलांना जास्त मागणी असते, तर हातदोर विक्री आणलेल्या बैलांची किंमत कमी असते.

यावर्षी वळवाच्या पावसात वीज पडून शेतकऱ्यांच्या जनावरांच्या जीविताची मोठ्या प्रमाणावर हानी झालेली आहे. आठ महिने जतन केलेली जनावरे ऐन शेतीच्या हंगामात मृत्युमुखी पडल्याने शेतीची मशागत करणे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दुरापास्त होणार आहे.

त्यामुळे शासनाने केवळ हंगामी शेतीवर गुजराण करणाऱ्या शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन तातडीने अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी नोंदविलेली आहे.

खासदार सवरांनी दिली आर्थिक मदतमोखाडा तालुक्यातील भोवाडी येथील शेतकऱ्यांची आठ जनावरे ऐन शेती हंगामात वीज पडून दगावली आहेत. अशा सर्व शेतकऱ्यांना खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी मोखाडा तालुका भाजपा अध्यक्ष संतोष चोथे यांच्या हस्ते आर्थिक मदत देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

बैलजोडीशिवाय पर्याय नसतो• आजोबा-पणजोबा यांच्या काळात ज्या कुटुंबात अधिक गायी-बैल आणि इतर जनावरे पाळली जात असत त्यांना अधिक श्रीमंत मानले जात असे, परंतु त्यावेळी गुरांना चरण्यासाठी वाव होता आणि मजूरही उपलब्ध होत असायचे. कालौघात चाऱ्याची मोठी परवड झाली आहे, तर मजूर क्वचितच मिळत आहेत. त्यांची मजुरी परवडणारी नाही. त्यामुळे बैलजोडी गरजेपुरती घेऊन आठ महिने सांभाळावी लागू नये म्हणून विक्री करणे हा पर्याय असल्याचे शेतकरी सांगत आहेत.• रब्बी हंगामात प्रगतशील शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने आधुनिक यंत्राद्वारे पेरणी करून घेतात, मात्र, अनेक ठिकाणी पावसाळ्यात शेतात ट्रॅक्टर जाऊ शकत नाही. तसेच काही शेतकऱ्यांच्या ऐपतीप्रमाणे बैलजोडीशिवाय पर्याय नसतो.

टॅग्स :बाजारशेतकरीशेतीपीकपेरणी