पंढरपूर : Kartiki Ekadashi 2024 कार्तिकी यात्रेनिमित्त वाखरी (ता. पंढरपूर) येथील पालखी तळावर भरविलेल्या खिलार जनावर बाजारात सुमारे ७००हून अधिक खिलार खोंड अन् बैल दाखल झाले आहेत.
यासाठी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून याठिकाणी वीज, पिण्याचे पाणी आदींची सोय करण्यात आली आहे. पंढरपुरात वर्षभरात भरणाऱ्या चार मोठ्या यात्रांमध्ये चैत्र, माघ आणि कार्तिकी यात्रेला वाखरी पालखी तळावर जनावरांचा बाजार भरविला जातो.
यामध्ये खिलार खोंड, बैल, गाय तसेच म्हैस यांचा समावेश असतो. गतवर्षापर्यंत बाजाराच्या ठिकाणी लम्पी आजाराचा परिणाम जाणवत होता. मात्र यंदा लम्पी बाधित जनावरे बाजारात कुठेही पहायला मिळालेली नाहीत.
पशुसंवर्धन व आरोग्य विभागाकडून पशुपालकांवर विविध आजार तसेच घ्यावयाची काळजी याबाबतची माहिती दिली जात आहे. वाखरी पालखी तळाच्या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली असून, त्याठिकाणी पाणी, वीज, स्वच्छतागृहे आदींची सोय करण्यात आली आहे.
पुढच्या दोन दिवसात बाजारात येणाऱ्या जनावरांची संख्या वाढेल, अशी माहिती बाजार समितीचे सचिव कुमार घोडके यांनी दिली. बाजाराच्या ठिकाणी देण्यात येत असलेल्या सेवासुविधांबाबत त्यांनी माहिती घेतली. यावेळी बाजार समितीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.