अरुण काशीदइचलकरंजी : शहरीकरण, चाऱ्याचा तुटवडा व महापुराचा बसणारा फटका यामुळे जनावरांची संख्या कमी होत असली तरी याला इचलकरंजी शहर अपवाद ठरले आहे. हौशी बैल पाळणाऱ्याची संख्या वाढली आहे.
शहरामध्ये स्पर्धेतील बैलांची संख्या १६० वर पोहोचली आहे. शहरातील जनावरांची संख्या स्थिर असल्याचे चित्र आहे. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या पशुगणनेनंतर याची नक्की आकडेवारी समोर येणार आहे.
इचलकरंजी हे औद्योगिक शहर असले तरी या शहरामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये बैल आणि गाय पाळणाऱ्यांची संख्या वाढली आहे. बैलांची संख्या वाढीला १२५ वर्षांची लाकूड ओढण्याच्या शर्यतीची परंपरा कारणीभूत आहे.
खिलार जातीचे बैल हौस म्हणून पाळण्याकडे गावभाग व परिसरातील नागरिकांचा कल वाढला आहे. चार ते पाच लाख रुपये किमतीचे बैल पाळले जात आहेत. खुल्या गटातील १५, दोन दाती ५५ आणि हातात दोरी धरून पळविण्यात येणाऱ्या सुट्टा बैलाची संख्या ९० इतकी आहे.
शहरामध्ये तीन गो-शाळा आहेत. शिवराणा गो-शाळेत ३५, लक्ष्मीनारायण गो-शाळेमध्ये १५०, अग्निहोत्री गो-शाळेत १०० जनावरे आहेत. प्रत्येक चार वर्षाला पशुगणना केली जाते. कोरोनामुळे ही गणना होऊ शकली नाही. सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये गणना होणार आहे. यामध्ये शहरातील गाय, बैल, म्हैस, घोडा, मेंढी, आदी पशुधनाची माहिती समोर येणार आहे.
पशुधनाची आकडेवारीशहरामध्ये ४११ मेंढ्या, ७७४ शेळ्या असे ११८५ पाळीव प्राणी व १२२७ गाय वर्ग, १६९१ म्हैस वर्ग अशी २९१८ जनावरे होती. कोंबड्यांची संख्या ९५० इतकी नोंदविण्यात आली. आता नवीन पशुगणनेनुसार यामध्ये वाढ अथवा घट होण्याची शक्यता आहे.
उच्च प्रतीचे बैल शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाळले जात आहेत. या जनावरांना लागणारा खुराकही बैलमालक देत आहेत. हौशी बैलमालकांमुळेच बैलांची संख्या वाढत आहे. - डॉ. सत्यदीप चिकबिरे, पशुधन विकास अधिकारी