Join us

शेतमालांच्या भावाने मारले, दुधाने तारले, चारा टंचाईमुळे दुध व्यवसाय अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 6:20 PM

जोडधंदा म्हणून दुध व्यवसायाकडे कल

आष्टी परिसरात दरवर्षी कधी दुष्काळ, तर कधी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडते. त्यातच शेतमालाला योग्य भाव मिळत नाहीत. दुष्काळाच्या या दुष्ट चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे वळत आहेत. दुध व्यवसायातून शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे. परंतु, चारा टंचाई भासत आहे. शिवाय, दुधाचे भावही कमी होत असून, शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत.

आष्टी परिसरात मागील पाच वर्षांत ५०० ते ७०० लिटर असलेले दूध संकलन आजरोजी २००० ते २२०० लिटर झाले आहे. आष्टीत पाथरी, परतूर, सातोना येथील खासगी दूध संस्था, तर एका कंपनीच्या दूध संकलन केंद्राद्वारा दूध खरेदी केली जाते.

यामुळे शेतकऱ्यांच्या हातात नियमित पैसा येत आहे. परिणामी, अनेक तरुण शेतकरी दुग्धव्यवसायाकडे वळले आहेत. परंतु, मागील वर्षीपेक्षा यावर्षी दुधाचे दर आठ ते दहा रुपयांनी कमी झाले असून, शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत. आष्टीमध्ये शासकीय दूध संकलन चालू करून दुधाची खरेदी करावी. सध्या पाच रुपये अनुदान जाहीर केले असले तरी ते अपुरे परंतु, यंदा पाऊस न झाल्याने चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. नदी-नाले, विहिरी, बोअरवेल कोरडे पडले आहेत.

पशुखाद्याचे भाव ३५०० ते ४००० क्विंटलपर्यंत गेल्याने दूध उत्पादनाचा खर्च वाढला आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हास्तूर तांडा येथील सुदाम राठोड हे अनेक वर्षांपासून मुलगा अशोक आणि नंदू यांच्या मदतीने दुग्ध व्यवसाय करतात. दररोज ६० लिटर दुधाचे संकलन ते करतात. खर्च वजा करून महिन्याला पन्नास हजारांचे उत्पन्न होत असल्याचे त्यांनी सांगितले.

दूध उत्पादक शेतकऱ्यांनी सध्या चालू असलेल्या वंध्यत्व निवारण अभियानाद्वारे वांझ असलेल्या गाई, म्हशी गाभण राहण्यासाठी उपचार करून घ्यावेत. त्यामुळे भाकड गाई, म्हशी जास्त दिवस सांभाळण्याचा खर्च वाचेल. -डॉ. एस. एल. डाके, पशुवैद्यकीय अधिकारी

वाहेगाव (सा) येथील कांतराव लहाने यांच्याकडे पाच म्हशी आहेत. दररोज ४० लिटर दूध संकलनाला देतात. महिन्याला खर्च वजा करता ३५ ते ४० हजारांचे उत्पन्न होत आहे. परंतु, चारा टंचाईमुळे दुग्ध व्यवसाय अडचणीत आल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :दुग्धव्यवसायदूधशेतकरी