दूध उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात मदत व्हावी, त्यांचा व्यवसाय तग धरून राहावा, यासाठी पशुसंवर्धनविषयक 'किसान क्रेडिट कार्ड योजना' शासनाने सुरू केली आहे. पशुसंवर्धन विभागाने आतापर्यंत तब्बल २९०५ प्रस्ताव बँकांकडे पाठवले आहेत. मात्र आतापर्यंत केवळ ५३९ दूध उत्पादकांना कार्ड मिळाले आहे. त्यामुळे पशुधन व दुधाचे उत्पादन कसे वाढणार? असा सवाल पशुपालकांमधून केला जात आहे.
हिंगोली जिल्ह्यात गाय व म्हैसवर्गीय पशुधन जवळपास ४ लाख ७७ हजार ५१९ एवढे आहे. शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी दूध उत्पादनाचा व्यवसाय करतात. शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्चुन दुभती जनावरे खरेदी केली आहेत. अनेकवेळा चाराटंचाई निर्माण झाल्यास पशुपालकांना विकतचा चारा घ्यावा लागतो. शिवाय उपचारासाठी पैसेही खर्च करावे लागतात. पिकांचे चांगले उत्पादन निघाले तर चारा व उपचारासाठी हाती चार पैसे असतात.
मात्र पीकपाणी चांगले नसले तर चारा, जनावरांच्या उपचारांचा खर्च कसा करायचा? असा प्रश्न निर्माण होतो. दूध उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असते.
अशा पशुपालकांना ऐनवेळी मदत व्हावी, यासाठी शासनाने पशुसंवर्धनविषयक किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे. या माध्यमातून जवळपास १ लाख ६० हजारांपर्यंत कर्ज उपलब्ध होते. पशुसंवर्धन विभागाने पशुपालक शेतकऱ्यांचे जवळपास २ हजार ९०५ प्रस्ताव बँकांकडे पाठवले आहेत. यातील केवळ ५३९ जणांनाच क्रेडिट कार्ड उपलब्ध झाले आहे.
सिबिल स्कोअरचा फटका
पशुसंवर्धन विभागाने दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आलेले अर्ज बँकेकडे पाठवले. छाननीनंतर काही अर्ज पात्र ठरले. यातही ५०० पेक्षा अधिक दूध उत्पादकांचे अर्ज सिबिल स्कोअर चांगला नसल्याने नामंजूर करण्यात आले.
प्रस्ताव २९०५; क्रेडिट कार्ड ५३९ जणांनाच
■ पशुपालक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा, दूध व्यवसाय टिकून राहावा, म्हणून पशुसंवर्धन विभागाने शिबिरे घेऊन योजनेची माहिती दिली. गरजू पशुपालकांचे प्रस्ताव स्वीकारून हे प्रस्ताव बँकेकडे सादर केले.
■ आतापर्यंत २९०५ प्रस्ताव सादर केले. मात्र बँकांनी आतापर्यंत केवळ ५३९ शेतकऱ्यांचेच प्रस्ताव मंजूर केले आहेत. यातही दुभती जनावरे असलेल्या १७७ जणांनाच क्रेडिट कार्ड मिळाले.
१ लाख ६० हजारांपर्यंत मिळते कर्ज
पशु किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत १ लाख ६० हजारांपर्यंत कर्ज मिळू शकते. काही अटी पूर्ण केल्यास ३ लाखांपर्यंतही कर्ज मिळण्यास मदत होते. १ लाख ६० हजारांपर्यतच्या कर्जासाठी शेतकऱ्यांकडे जनावरे आवश्यक आहेत तर ३ लाखापर्यंतच्या कर्जासाठी डेअरीचा सभासद अथवा दूध विक्रीचे पैसे बँक खात्यावर जमा होणे आवश्यक असतात.
हिंगोली जिल्ह्यातील पशुधन
गाई २,३२,२०३म्हशी ७४,१२५शेळ्या १,५४,२८४मेंढ्या १६,९०७
हेही वाचा - Milk Rate Of Maharashtra शेतकऱ्यांच्या दुधापेक्षा पाण्याच्या बाटलीला अधिक भाव का?