पेठवडगाव : दसऱ्यापूर्वी भरणाऱ्या येथील ऐतिहासिक लक्ष्मीच्या जनावर बाजारात खरेदी विक्रीची परंपरा व्यापारी, शेतकरी यांनी जपली. यामध्ये तीन कोटींची उलाढाल झाली.
वडगाव संभापूर रस्त्यावर दुतर्फा जुनी पाण्याची टाकी ते आंबेडकर महाविद्यालयापर्यंत बाजार भरला होता. मिणचे येथील सुनील जाधव व अनिल जाधव यांनी २० पैकी १९ म्हशींची विक्री केली.
नायकू महादेव भोसले (रा. बावची) यांची नऊ लाख किमतीची खिलार जातीची बैलजोडी लक्ष वेधून घेत होती. आबासो रामचंद्र काशीद (वस्ताद) यांनी मेंढा जातीची म्हैस दीड लाख किमतीला बाबासो चरणे (तळसंदे) यांना विक्री केली.
मोहन चव्हाण (बुवाचे वठार) यांची खिलार जातीची बैलजोडी चार लाखांपर्यंत होती. शिवाजी लाड (येळापूर) याचा मुरा जातीचा वळू विक्रीसाठी आला होता. त्याची किंमत अडीच लाख होती. बाजारावर सभापती सुरेश पाटील, सचिव जितेंद्र शिंदे यांच्या पथकाची देखरेख होती.