लसुणघास हे व्दिदलवर्गीय बहुवार्षिक सदाहरित चारा पीक असून हिरव्या चाऱ्यात प्रथिने, अ व ड जीवनसत्वे इत्यादी घटकांचे पुरेशे प्रमाण असते.
लसुणघासामुळे जनावरांची भूक वाढते. पचनक्रिया सुधारते. शारीरिक झीज भरून निघते व हाडांची योग्य प्रमाणात वाढ होते तसेच दुधाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. हिरव्या चाऱ्यात १९ ते २२ टक्के प्रथिनांचे प्रमाण असते.
जमीन व पूर्वमशागत
चांगल्या निचरा होणाऱ्या मध्यम ते भारी जमिनीची निवड या पिकासाठी करावी. हे पीक तीन वर्षापर्यत टिकणारे असल्यामुळे जमिनीची चांगली मशागत करावी व प्रति हेक्टरी १० टन शेणखत द्यावे व एक नांगरट व कुळवाच्या दोन-तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.
बियाणे व बीजप्रक्रिया
- पेरणीसाठी खात्रीशीर, शुध्द व जातिवंत बियाणे वापरावे. बऱ्याच वेळा बियाण्यामध्ये अमरवेल या परोपजीवी वनस्पतींच्या बियाण्याचा समावेश असण्याचा संभव असतो, त्यामुळे खात्रीशीर स्तोत्राकडूनच बियाणे खरेदी करावे.
- पेरणीसाठी आर.एल. ८८, आनंद - ३ या सुधारीत जातींचे प्रति हेक्टरी २५ किलो बियाणे वापरावे.
- बियाणे पेरणीपुर्वी प्रति दहा किलो बियाण्यास २५० ग्रॅम रायझोबियम या जिवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी.
लागवड कशी करावी?
- जमिनीचा उतार बघून पाणी योग्य व समप्रमाणात देता येईल असे वाफे तयार करून घ्यावेत.
- वाफ्यामध्ये ३० सें.मी. अंतरावर काकऱ्या पाडुन त्यामध्ये हेक्टरी २० किलो नत्र, ८० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावे.
- अशा काकऱ्यामध्ये चिमटीने बी पेरून हाताने काकऱ्या बुजुन घ्याव्यात.
- शेतकरी अनेकदा बी फोकुन पेरणी करतात त्यामुळे जास्त प्रमाणात बियाणे वापरावे लागते.
खात व्यवस्थापन व आंतरमशागत
- प्रत्येक चारा कापण्यानंतर २० किलो नत्र व ५० किलो स्फुरद (किंवा १०० किलो डी.ए.पी.) प्रति हेक्टरी द्यावे.
- बी पेरल्यानंतर पहिले पाणी हळुवार द्यावे.
- बहुवार्षिक चारा पीक असल्याने प्रत्येक कापणीनंतर खुरपणी करावी.
पिक संरक्षण
१) फुले व शेंगा खाणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव दिसुन येताच एच.ए.एन.पी.व्ही. (फुले हेलीओकील) हेक्टरी १० मिली प्रती १० लिटर पाण्यातुन संध्याकाळी फवारणी करावी.
२) ट्रायकोग्रामा चिलोनीस या परोपजीवी कीटकांचे १,००,००० कीटक प्रति हेक्टरी या प्रमाणात प्रसारण करावे. दुसरे प्रसारण पहिल्या प्रसारणनंतर ८ दिवसांनी करावे.
३) बि.टी. १ कि. प्रति हेक्टरी या प्रमाणात ५०० लिटर पाण्यातून परोपजीवी किटकांच्या प्रसारणानंतर ८ दिवसांनी फवारावे.
अधिक वाचा: Murghas : मुरघास चांगला तयार झाला आहे का नाही हे कसे ओळखावे?