Nashik : सगळा महाराष्ट्र दुष्काळाशी (Maharashtra Drought) दोन हात करताना दिसतो आहे. जिकडं पाहाल तिकडे उघडी बोडकी जमीन आणि रखरखतं उन्ह अनुभवयाला मिळतं आहे. एकीकडे उन्हाची लाहीलाही झाली असतांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. माणसांची ही अवस्था असताना मुक्या जनावरांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळेच दूध व्यवसायावर (milk Supply) अवलंबून असलेल्या नाशिकच्या (nashik) सिन्नर तालुक्यातील 60 टक्के शेतकरीच सध्या मोठ्या अडचणीत सापडले असून त्यांचं अर्थकारणच पूर्णतः बिघडल आहे.
नाशिक जिल्ह्यातील महत्वाचा तालुका म्हणून सिन्नरची (sinnar) ओळख आहे. त्याचबरोबर या तालुक्यात मोठ्या प्रमाणात दूध व्यावसायिकांचा राबता पाहायला मिळतो. या तालुक्यातून बाहेरच्या जिल्ह्यासोबतच अगदी गुजरात राज्यातही दूध जाऊन पोहोचते. मात्र सध्या तालुक्यातील जवळपास 60 टक्के शेतकऱ्यांच्या अर्थकारणाचा कणा असलेला हा दूध व्यवसाय दुष्काळाच्या झळामुळे अडचणीत सापडलाय. गेल्या वर्षी पाऊस अत्यल्प झाल्याने निर्माण झालेली चारा आणि पाणी टंचाई, पशुखाद्याच्या वाढलेल्या किंमती यामुळे जनावरांचा सांभाळ करणंही बळीराजाला अवघड होऊन बसलंय.. एकूणच निर्माण झालेल्या या सर्व परिस्थितीमुळे दूध संकलनात 40 टक्क्यांची घट झाल्याचं दूध विक्री संघाकडून सांगण्यात येतय.
सिन्नरच्या पांगरी गावातील शेतकरी केशव शिंदे हे गेल्या 30 वर्षांपासून ते दुधाचा व्यवसाय करतात. मात्र निसर्गाकडून न मिळणारी साथ, दुधाला न मिळणारा भाव, उत्पन्नापेक्षा अधिक होणारा खर्च या सर्व परिस्थितीशी गेल्या काही महिन्यांपासून ते झगडत आहेत. त्यामुळे हा व्यवसाय आता नकोसा झाल्याचं त्यांनी सांगितल. शिंदे यांच्याकडे सध्या कूण 40 गाई असून, रोज 250 लिटर दूध देतात. एका लिटरला 26 रुपये लिटर भाव मिळतो, मात्र त्या तुलनेत या गाईंना दिवसाला 4 हजार रुपयांचा चारा लागतो. यासोबतच खाद्य, औषध यावर शिंदे यांचे 11 हजार रुपये खर्च होतात. त्यामुळे एकंदरीतच या सर्व परिस्थितीमुळे हतबल होऊन गेल्याच आठवड्यात त्यांनी आपल्या 40 पैकी 4 गाईंची विक्री देखील केली असल्याचे ते म्हणाले.
मुक्या जीवांचं काय?
आज अनेक भागातील नागरिक पाणी विकत घेऊन तहान भागवत आहेत. दुसरीकडे नागरिकांची अशी अवस्था असताना मुक्या जीवांना मात्र अधिक यातना सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे जिथे नागरिकांना पिण्यासाठी पाणी विकत घ्यावं लागतं असेल, तिथे जनावरांची काय अवस्था असेल याची कल्पना न केलेलीच बरी.. गेल्या वर्षी वरुणराजा रुसला तर यावर्षी सूर्यही आग ओकत असल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. या सर्व वातावरण बदलामुळे शेतकऱ्याचे सर्व अर्थकारणच विस्कळीत झाल आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी तरी पाऊस धो धो पडू दे आणि शेतकऱ्याचं हे सारं दुःख दूर होऊ दे एवढीच प्रार्थना शेतकरी करत आहेत.