Join us

Agriculture News : गाय किंवा म्हशीला प्रतिदिन 250 ते 300 रुपयांचा खर्च, कसा करायचा दूध व्यवसाय? 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 4:14 PM

Agriculture News : यातही पशुखाद्याचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना गाई म्हशींना सांभाळणे जिकिरीचे झाले आहेत.

Agriculture News : एकीकडे रासायनिक खतांच्या किंमती (Fertilizers) वाढल्यामुळे सेंद्रिय शेतीकडे वळू लागले आहेत. तर दुसरीकडे शेती पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसायाची जोड दिली जात आहे. मात्र यातही पशुखाद्याचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना गाई म्हशींना (Livestock) सांभाळणे जिकिरीचे झाले आहेत. आजमितीस गाय किंवा म्हशीला प्रतिदिन जवळपास २५० ते ३०० रुपयांचा खर्च येऊ लागला असून दुसरीकडे दुधाला मात्र कमी दर मिळत असल्याचे शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत. 

दूध व्यवसायासाठी (Milk Business) शासन स्तरावरून प्रोत्साहन दिले जात असले, तरी ते नावापुरतेच असते. एकदा लाभार्थ्याला ही योजना मंजूर झाल्यावर पुन्हा त्याकडे यंत्रणा ढुंकूनही पाहात नाही. नुसतं हिरवा चारा खाल्ल्याने दूध वाढत नाही, तर त्यांना पशुखाद्य सुद्धा द्यावे लागते. पण आज पशुखाद्याच्या किमतीमध्ये एवढी वाढ झाली आहे की त्यापेक्षा दुधाच्या किमती कमी आहे. त्यामुळे परवडत नसल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. 

एकीकडे ग्रामीण भागात रोजगाराची आधीच कमतरता असते. त्यामुळे ग्रामीण भागातील लोक मिळेल तो रोजगार करून आपला उदरनिर्वाह करत असतात. शासन स्तरावर जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाला प्रोत्साहन दिले जात आहे. अनेकांनी बँकांकडून कर्ज घेऊन हा मार्ग स्वीकारलाही आहे. मात्र, या व्यवसायातील खरी अडचण वेगळी आहे. आता तर दुधाळ जनावरे देखील वाटप केली जात आहेत, मात्र जनावरांना खाऊ घातल्यानंतर दूध उत्पादन मिळण्यास मदत होईल. मग पशुखाद्याचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांना इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

असा येतोय प्रतिदिन खर्च 

एक गाय किंवा म्हशीला प्रतिदिन जवळपास २५०ते ३०० रुपयांची खिलाई लागते आणि इतर खर्च आणि मेहनत वेगळी। दुधातील फॅटनुसार डेअरीवर म्हशीच्या दुधाला प्रति लिटर ४० ते ५० रुपये दर मिळतो. तर गाईच्या दुधाला ३० ते ४० रुपये दर मिळतो. सुग्रास, सरकी, ढेपचे पोते १० वर्षांपूर्वी ३५० रुपयाला मिळायचे. आता तेच मागील दोन वर्षांत ९०० रुपयांवरून १३०० रुपयांवर होते. आता १८०० रुपयांवर पोहचले आहे. पशुखाद्यात प्रचंड दरवाढ झाली आहे. 

टॅग्स :दुग्धव्यवसायदूधशेती क्षेत्रशेती