Join us

Agriculture News : गाेकुळ नांदेल खरे, पण भ्रूण प्रत्याराेपण प्रयाेगशाळांचे काय? नेमकं प्रकरण काय?

By सुनील चरपे | Published: October 18, 2024 11:19 AM

Agriculture News : त्यामुळे देशी गाईंच्या वंश शुद्धतेसाेबत पैदास व दूध उत्पादनावर तसेच या याेजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

- सुनील चरपे

नागपूर : राज्य सरकारने विदर्भ मराठवाडा (Vidarbha-Marathwada) दुग्धविकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात सहा गाेवंश भ्रूण प्रत्याराेपण प्रयाेगशाळा निर्मितींना ५ ऑक्टाेबर २०२३ राेजी मंजुरी दिली. वर्षभरात यातील एकाही प्रयाेगशाळेच्या निर्मितीला सुरुवात करण्यात आली नाही. त्यामुळे देशी गाईंच्या वंश शुद्धतेसाेबत पैदास व दूध उत्पादनावर तसेच या याेजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राज्यातील देशी गाईंची वंश शुद्धता जाेपासून त्यांची संख्या व दुधाचे उत्पादन (Milk Production) वाढविणे तसेच पशुपालकांच्या उत्पन्नात वाढ करणे हा याेजनेमागचा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी राज्यातील सहा महसुली विभागात प्रत्येकी एक अशा सहा भ्रूण प्रत्याराेपण प्रयाेगशाळा निर्माण करण्याचा सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला. यात मुंबई विभागातील जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र, पेण, जिल्हा रायगड, नाशिक विभागातील लाेणी (बुद्रुक), ता. राहता, जिल्हा अहमदनगर, पुणे विभागातील वळूमाता प्रक्षेत्र, ताथवडे, पुणे, छत्रपती संभाजीनगर विभागातील वळू संगाेपन केंद्र, छत्रपती संभाजीनगर (हर्सुल).. 

तसेच अमरावती विभागातील जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र, अकाेला आणि नागपूर विभागातील पशुपैदास प्रक्षेत्र, हेटीकुंडी, ता. कारंजा (घाडगे), जिल्हा वर्धा या प्रयाेगशाळांचा समावेश आहे. वर्षभरात यातील एकाही प्रयाेगशाळेच्या कामाला सुरुवात करण्यात आली नाही. या प्रयाेगशाळांमध्ये सहायक आयुक्त (पशुसंवर्धन) पदापासून ते परिचरापर्यंत कुठलीही पदभरती करण्यात आली नाही. तिथे भ्रूण प्रत्याराेपणासाठी लागणारी अत्याधुनिक साधनसामग्रीदेखील उपलब्ध करून देण्यात आली नाही.

२,७०४.०८ लाख रुपये मंजूरप्रत्येक भ्रूण प्रत्याराेपण प्रयााेगशाळेच्या निर्मितीसाठी राज्य सरकारने ४५०.६८ लाख रुपयांप्रमाणे एकूण २,७०४.०८ लाख रुपये मंजूर केले आहेत. यात प्रयाेगशाळा इमारत बांधकामासाठी ९६.१४ लाख, स्वच्छ रूम २५ लाख, संयंत्रे व उपकरण खरेदी १९०.५४ लाख व माेबाइल व्हॅन खरेदीसाठी ७२.९७ लाख रुपयांचा समावेश असून, यात वर्षभराचा आवर्ती खर्च ५७.१९ लाख व प्रशासकीय खर्च ८.८४ लाख रुपये जाेडला आहे.

पदभरती शून्यप्रत्येकी आठ याप्रमाणे सहा प्रयाेगशाळांसाठी एकूण ४८ मनुष्यबळाची आवश्यकता आहे. यात प्रत्येकी एक सहायक आयुक्त पशुसंवर्धन (पदव्युत्तर पदविकाधारक-पशुप्रजनन), पशुधन विकास अधिकारी गट-अ (पदव्युत्तर पदविकाधारक-पशुप्रजनन), जैवतंत्रज्ञ, पशुधन पर्यवेक्षक, प्रयाेगशाळा मदतनीस, वाहनचालक व दाेन परिचरांचा समावेश आहे. यातील एकही पद आजवर भरण्यात आलेले नाही.

टॅग्स :दुग्धव्यवसायदूधगायशेती क्षेत्रशेती