Join us

Milk Protest : दूध आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा, उद्यापासून राज्यव्यापी संघर्ष सप्ताह 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 6:47 PM

Dudh Andolan : दुधाला अपेक्षित असा दर मिळावा यासाठी पुन्हा दूध आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे.

Milk Rate Issue :दुधाला (milk Rate) प्रति लिटर 40 रुपये भाव मिळावा व दूध प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी दुधाला  एफ.आर.पी. व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करावे या प्रमुख मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यानुसार उद्यापासून राज्यभरात तीव्र आंदोलनाची हाक देण्यात आल्याचे शेतकरी समितीने सांगितले. 

गेल्या अनेक दिवसांपासून दूध दराचा (Milk Rate Issue) प्रश्न राज्यभर गाजत आहे. शेतकरी संघटनांच्या माध्यमातून दूध दराच्या प्रश्नाला वाचा फोडण्यात आली आहे. पावसाळी अधिअवेशनातही हा प्रश्न गाजला. मात्र शेतकऱ्यांच्या मागणीनुसार अद्याप निर्णय झाला नसल्याचे चित्र आहे. यापूर्वीच शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून करण्यात आले होते. आता आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे. आंदोलनाच्या या टप्प्यामध्ये 15 जुलै ते 21 जुलै या आठवडाभराच्या कालावधीमध्ये राज्यभर स्थानिक पातळीवर तीव्र आंदोलने करण्याची हाक दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने दिली आहे. आज दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला. 

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये कोतुळ या ठिकाणी सुरू असलेल्या धरणे आंदोलनाचा नववा दिवस असूनही या आंदोलनाकडे सरकारने हेतूतः दुर्लक्ष चालवले असल्याचे समितीचे म्हणणे आहे. राज्यभरात विविध ठिकाणी होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मंत्रालय स्तरीय बैठकीत सुद्धा दूध उत्पादकांच्या मागण्या फेटाळून लावण्यात आल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर दिनांक 15 जुलै ते 21 जुलै या कालावधीमध्ये संघर्ष समिती सहभागी असणाऱ्या संघटना, नेते आणि कार्यकर्ते स्थानिक पातळीवर विविध प्रकारच्या आंदोलनांना चालना देणार आहेत. 

दूध आंदोलन सप्ताह 

दरम्यान धरणे आंदोलने, दुग्धाभिषेक, दूध हंडी, दूध परिषदा, मोटार सायकल रॅली, पायी दिंडी, निदर्शने, लोकप्रतिनिधींच्या भेटी, लाक्षणिक उपोषणे व रास्ता रोकोच्या माध्यमातून सबंध आठवडाभर ठिकठिकाणी आपल्या मागण्यांकडे दूध उत्पादक सरकारचे लक्ष वेधणार आहेत. सबंध आठवडाभर तीव्र आंदोलने करूनही सरकारने जर मागण्यांची दखल घेतली नाही तर सर्व राज्यभरातील ताकद एकत्र करून जबरदस्त आंदोलनात्मक कृती राज्याच्या केंद्रस्थानी संघटित करण्यात येईल, असा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.  

टॅग्स :दूधदुग्धव्यवसायदूध पुरवठाशेती क्षेत्रशेतकरी आंदोलन