Bail Pola : आज पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची लगबग पाहायला मिळत आहे. बाजारपेठा रंगीबेरंगी साहित्याने सजल्या आहेत. दरम्यान, दिवसेंदिवस पशुधनाची संख्या घटत आहे. त्यातच शेत कसण्यासाठी अत्याधुनिक साहित्यासह मिनी वाहने उपलब्ध झाल्याने आता दाराशी बांधली जाणारी सर्जाराजाची आबदार आणि रुबाबदार जोडी 'गावकी'तून हरवत चालल्याचे चित्र दिसून येत आहे.
गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार राज्यात १ कोटी ३९ लाख पशुधन आहे. यामधील १ कोटी १० लाख जनावरे ही वंशावळीची माहिती नसलेली आहेत. १५ लाख जनावरे शुद्ध जातीची आहेत; तर उरलेली २७ लाख जनावरे संकरित आहेत. राज्यात म्हशींची संख्या ही ५५ लाखांच्या आसपास आहे; तर राज्यात अधिकृत नोंदणी असलेल्या सात प्रकारच्या गायींच्या जाती आहेत.
सर्जा-राजाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो. कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झाले असले तरी पोळ्याचे महत्व अजूनही कायम आहे. पोळा हा बैलांच्या सन्मानाचा सण आहे. महाराष्ट्राच्या काही भागांत हा सण दोन दिवस साजरा केला जातो. पोळा म्हणजेच पहिल्या दिवसाला मोठा पोळा आणि दुसऱ्या दिवसाला लहान मुले लाकडाचे नंदीबैल सजवितात, याला तान्हा पोळा म्हणून साजरा केला जातो. तळहातावरच्या फोडाप्रमाणे सर्जा-राजाला जपणारा शेतकरी नक्कीच पोळ्यालाही पशुधनाचे हित जोपासेल, यात शंका नाही. गैरप्रकार होणार नाहीत, यादृष्टीने प्रत्येक पशुपालकांनी काळजी घ्यावी. - डॉ. श्यामकांत पाटील, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग
बैलांचे प्रमाण घटले
शेतीक्षेत्रात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरणाचा वापर सुरू झाला आहे. जातिवंत बैलांची पैदास कमी होऊ लागली, त्यामुळे शेतीक्षेत्रातील बैलांची संख्या कमी होऊ लागली. बैलांकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे; त्यामुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे. लम्पी स्किन आजारामुळे गायींपेक्षा बैलांचा जास्त प्रमाणात मृत्यू झाला आहे. आजारासह मृत्यूच्या संकटांना वैतागून शेतकरीही यांत्रिकीकरणाकडे वळला आहे. शेतात यांत्रिकीकरणाचा वापर वाढला असून, बैलांची संख्या कमी झाली करण्यासाठी बैल नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. बैलांचा वापर वाढला तर जमिनीचा सुपीकपणा वाढेल, असेही तज्ज्ञ सांगतात.
प्रमाण वाढवायचे कसे? शेतात बैलांचा वापर वाढवावा लागेल. शुद्ध बैलांची पैदास करण्यासाठी चांगले वळू निर्माण करावे लागतील. शेतकऱ्यापर्यंत गोशाळा पोहोचायला हव्यात. शेतकऱ्यांनी गोशाळा जगवाव्यात, गोशाळेने शेतकरी जगवावेत. बैलांसाठी शासनाने मोफत उपचार करावे. बैलांच्या संवर्धनासाठी काही योजना आखणे गरजेचे आहे. बैलखरेदीसाठी अनुदानासह एखादी योजना शासनाने हाती घ्यावी.