नाशिक : वाढत्या तापमानाच्या (Temperature) झळा शरीराला टोचत असतानाच, मालेगाव बाजार समितीच्या (Malegoan Cow Market) आवारात दर शुक्रवारी भरणाऱ्या जनावरांच्या बाजारात गाई-गुरांच्या व्यवहारांना उकाड्यातही उधाण आलेले दिसून आले. या आठवड्यातील बाजारात विशेष लक्ष वेधले ते जर्सी व एचएफ (होलस्टीन फ्रिजिअन) गाईच्या दरांनी.
एचएफ गायीला (HF Cow) तब्बल ७० ते ९० हजार रुपयांपर्यंतचा उच्च दर मिळाल्याचे पाहायला मिळाले. काळे-पांढरे चट्टे असलेल्या या गाईला दूधासाठी मोठी मागणी आहे. जर्सी गायीसाठी (Jersey Cow) ४० ते ५५ हजार रुपयांचा दर सहज मिळताना दिसला. याशिवाय साहिवाल, गिर, लाल कंधारी या स्थानिक जातींचीही उपस्थिती समाधानकारक होती. शेळया देखील विक्रीसहोत्या.
येत्या आठवड्यात चारा महाग होण्याची शक्यता...तापमान वाढतच चालल्याने येत्या आठवड्यांत पशू बाजारावर याचा परिणाम अधिक जाणवू शकतो, अशी शंका अनेक विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. परंतु, दर वाढलेले असल्यानं पशुधन विक्रीस उत्साहही तसाच असल्याचे जाणवले. येणाऱ्या काळात चारा महाग होण्याची शक्यता असल्याने याचा थेट परिणाम पुढील पशू बाजारात पहावयास मिळेल, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.
बाजार लवकर विसर्जित..शुक्रवारी उन्हामुळे बाजार सकाळी लवकर भरून दुपारच्या आधीच विसर्जित झाला. दर शुक्रवारी साधारणतः १०० ते १५० गायींची खरेदीविक्री होत असते. मात्र या शुक्रवारी केवळ ७० ते १०० गायींचा व्यवहार झाला.
विक्रेत्यांनाही संरक्षण..बाजार समिती अधिकृत पावतीद्वारे व्यवहार करत असल्याने खरेदीदार व विक्रेत्यांना संरक्षण मिळते. फसवणूक झाल्यास व्यवहार परत घेण्याची सुविधाही उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा बाजार एक विश्वासार्ह आणि सुरक्षित पर्याय ठरतो.