- प्रमोद पाटील
जळगाव : अनेक ठिकाणच्या शर्यती जिंकणाऱ्या कासोदा (ता. एरंडोल) येथील एका दीड वर्षाच्या वासराला कर्जत (Karjat) येथील कैलास मते यांनी तब्बल बारा लाख २१ हजार रुपयांना विकत घेतले आहे. दोन दिवसांपूर्वी कासोद्यात हा सौदा झाला आणि एकच चर्चा सुरू झाली.
कासोदा येथील भूषण अरुण खैरनार या तरुणाने २२ एप्रिल २०२४ रोजी एका गोऱ्ह्याला (बछडा) ८० हजार रुपयांत विकत घेतले होते. भूषण यास बैलांच्या शर्यतीची (Bailgada Sharyat) आवड आहे. त्यामुळे शर्यतीसाठी तो असे बछडे विकत घेत असतो. त्याचा हा गोऱ्हा दि.१५ रोजी कर्जतच्या शर्यतप्रेमी व्यक्तीने तब्बल १२ लाख रुपयांत विकत घेतला. त्यामुळे भूषणसह त्याचा गोन्हाही चर्चेत आला आहे.
बैल विकत घेतांना पारखी लोक त्याचे दात पाहतात. दात पाहून त्याचे वय या लोकांना कळते. गोऱ्ह्याला फक्त दोनच दात असल्याने त्याचे वय किमान दीड वर्षे असावे, असा कयास आहे. भूषणने गोऱ्हा विकत आणल्यावर चाळीसगावच्या राहुल झोडगे या मित्राकडे पाठवले. तेथे त्याला गव्हाचे पीठ, बीट, ओल्या मक्याची कणसे व चारा असा खुराक सुरू केला.
मल्हारी एरंडे व भैय्या हुरे (कासोदा) यांनी त्याला शर्यतीसाठी चांगले तयार केले. या गोऱ्ह्याने आजतागायतच्या सर्व शर्यती जिंकल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर, कन्नड, जैतापूर (सातारा), आंबेगाव, आडगाव (नाशिक), गोंडगाव, कासोदा व कर्जत तसेच मुंबईतील काही शर्यती जिंकल्याने तो शर्यत क्षेत्रात चर्चेत आला.
एका वर्षात १२ लाख किंमत
दि.१५ रोजी कशेळे (ता. कर्जत) येथील कैलास मते यांनी या गोऱ्ह्याचा सौदा केला व दि.१६ रोजी कासोद्याहून कर्जतकडे रवाना झाला. २२ एप्रिल २०२४ रोजी ८० हजारांत विकत आणलेला हा बछडा अवघ्या एका वर्षात १२ लाख २१ हजार रुपये देऊन गेला आहे.