Join us

Milk Campaign : माफसूकडून ‘दूध प्या, दीर्घायुषी व्हा’ अभियान, दुधाचे फायदे काय आहेत? 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2024 10:58 AM

Milk Campaign : ‘दूध प्या, दीर्घायुषी व्हा!’ या ‘टॅगलाइन’ खाली राज्यभर दूध जागरुकता अभियान पुढील वर्षभर राबविण्यात येणार आहे.

नागपूर : मानवी आराेग्याच्या दृष्टीने दुधाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतात दूध पिण्याचा इतिहास फार जुना असून, ही अस्सल भारतीय संस्कृती आहे, आहे प्रतिपादन माफसू (महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ)चे कुलगुरू डाॅ. नितीन पाटील यांनी ‘दूध प्या, दीर्घायुषी व्हा’ या देशव्यापी जनजागृती अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी केले.

माफसूच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त जागतिक दूध दिनानिमित्त विद्यापीठाने दुधातील माैलिक घटकांबाबत वर्षभर जनजागृती करण्याचा निर्णय घेत या नावीण्यपूर्ण अभियानाला सुरुवात केली. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माफसूचे संशोधन संचालक डॉ. नितीन कुरकुरे, अभियानाचे संयोजक तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाने, दुग्ध तंत्रज्ञान अधिष्ठाता डॉ. प्रशांत वासनिक उपस्थित होते.

डाॅ. अनिल भिकाने म्हणाले, ‘दूध प्या, दीर्घायुषी व्हा!’ या ‘टॅगलाइन’ खाली राज्यभर दूध जागरुकता अभियान पुढील वर्षभर राबविण्यात येणार आहे. अलीकडे काळात दुधाबाबत लोकांमध्ये निर्माण झालेले विविध गैरसमज वैज्ञानिक दृष्टिकाेनातून दूर केले जाईल. फास्ट फुडकडे वळलेल्या तरुणाईस दुधाचे महत्त्व सांगून राज्यात दुधाचे सेवन वाढण्यासाठी जागरुकता निर्माण करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. नितीन कुरकुरे यांनी जागतिक दूध दिनाचा इतिहास उलगडून सांगितला. डॉ. प्रशांत वासनिक यांनी दुधातील घटक, दुधाच्या प्रत्येक घटकाचे मानवी आरोग्यासाठी महत्त्व व फायदे समजावून सांगितले. या अभियानांतर्गत सामूहिक दूध सेवन, सेल्फी वुईथ ग्लास ऑफ मिल्क, प्रबोधनपर व्याख्याने, रॅली, प्रकाशने आदी १०० उपक्रम राबविले जात आहेत. संचालन संयोजन समितीचे सचिव डॉ. गजानन नारनवरे व डाॅ. प्रवीण बनकर यांनी संयुक्तरीत्या केले तर डॉ. सारीपुत लांडगे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला माफसू अंतर्गत सर्व महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता, प्राध्यापक, विद्यार्थी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दुधाचे अर्थकारण व माैलिक घटकराज्यात दरडोई दुधाचे सेवन हे ३२९ ग्राम असून, देशाच्या सरासरी ४५९ ग्रामपेक्षा खूप कमी असल्याचे आहे. दूध पिण्याचे प्रमाण वाढले तर दूध दरवाढ आणि दूध उत्पादन वाढीला चालना मिळेल. यातून शेतकरी, दूध उत्पादक व व्यावसायिक आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, अशी माहिती डाॅ. अनिल भिकाने यांनी दिली. गाईच्या व वेगन दुधातील फरक विशद करताना गाईच्या दुधात १३ नैसर्गिक पोषकतत्त्वे असून वेगन दुधात ५ ते १० वनस्पतीजन्य पोषकतत्त्वे असतात. उत्पादक कंपनीनुसार त्याचे प्रमाण बदलत असते. गाईच्या दुधातील स्निग्ध पदार्थ, प्रथिने, व्हिटॅमिन्स व खनिजे पचनास हलके असून, त्यांचे पोषणमूल्य अधिक असल्याचे डॉ. प्रशांत वासनिक यांनी सप्रमाण सिद्ध करून दिले.

विविध आजारांपासून संरक्षणदुधामुळे जीवनशैलीचे आजार होतात, हे मिथक असून, मधुमेह तज्ज्ञ डॉ. मोहन यांनी पाच महाद्विपातील २७ देशांमधील जवळपास दाेन लाख लोकांवर सतत २० वर्षे केलेल्या संशोधनाच्या निष्कर्षानुसार दुधाच्या नियमित सेवनाने मधुमेह, हृदयरोग व इतर जीवनशैलीच्या आजारांपासून संरक्षण करते. एवढेच नव्हे तर पोषण सुधारण्यासोबतच मृत्यूदर कमी होतो, डॉ. मोहन यांनी त्यांच्या संशाेधनात नमूद केले. ए वन आणि ए टू दूध हे विपणन धोरण असल्याचे व भारतात उपलब्ध जनावरांचे दूध ए टु प्रकाराचे असल्याचे एन. बी. ए. जी. आर. करनाल येथील राष्ट्रीय संस्थेने संशोधन अंती जाहीर केले आहे. त्यामुळे आपल्याला ए वन दुधाची भीती बाळगण्याचे काहीच कारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :शेतीशेती क्षेत्रनागपूरदूधदूध पुरवठा